मुंबई प्रतिनिधी :
दि. २३ जुलै २०२५
अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या ‘सैयारा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. १८ जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट तरुणाईला विशेष आकर्षित करतोय. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल अनेक प्रतिक्रिया आणि मीम्स व्हायरल होत आहेत. चित्रपटातील भावनिक दृश्यांमुळं अनेकजण थिएटरमध्ये रडताना दिसत आहेत, ज्यामुळं आता सोशल मीडिया ओपन केल्यावर हसावं की रडावं…असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय.
‘सैयारा’ चित्रपटामुळं तरुणाईमध्ये एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
थिएटरमध्ये तरुण प्रेक्षक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी आपल्या बिघडलेल्या प्रेमसंबंधांना आठवून दुःखी होत आहे, तर कुणी प्रेमात झालेल्या फसवणूकीबद्दल बोलताना ढसाढसा रडत आहेत. यात जेन-झींची संध्या अधिक आहे. सिनेमागृहांमध्ये सध्या हे जेन झी फक्त रडत आहेत आणि त्याचं कारण ‘सैयारा’ आहे. पण अनेकजण या सिनेमातील दृश्यांची खिल्ली देखील उडवत आहेत, कारण यापूर्वी कोणत्याही चित्रपटानं थिएटरमध्ये इतकी क्रेझ निर्माण केली नव्हती.
चित्रपटाच्या शेवटी तर काहीजण ढसाढसा रडतायत, काहीजण किंचाळतायत, काही जण खाली लोळतायत…असे एक दोन नव्हे अनेक व्हिडिओ समोर आलेत. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता यावर मीम्सही आणि मजेशीरी व्हिडिओही बनवले जात आहेत.
एकानं म्हटलं आहे की, चित्रपट चांगलाय , पण इतके वेड लागण्यासारखं काही नाही. दुसऱ्या एकानं म्हटलं की सैयारा हा व्हायरल बनला आहे, देशातील तरुण रडत आहे.तर काही जणांनी हा पीआर स्टंट असल्याचं म्हटलं. एकानं लिहिलं की, कुणीतरी यांना विचारा की या नाटकासाठी निर्मात्यांकडून यांनी किती पैसे घेतले आहेत.
एकानं तर लिहिलं की, यापूर्वी असं ‘पठाण’च्या वेळी झालं होतं.दोन्ही वायआरएफचे चित्रपट आहेत… त्यामुळं हे स्पष्ट आहे की ही त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनली, आधी काही लोकांना असं करून दाखवा, मग जनता आपोआप तेच करू लागेल.वडील घरातून पाठवतात की मुलगा शिकून काहीतरी बनेल, पण इथे तर तो हा सैयारा बघून सैराट झालाय.
सिनेमाच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं इतिहास रचला आहे. दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या या चित्रपटाने चार दिवसांत १०५ कोटींचा टप्पा पार केला आहे.