मुंबई प्रतिनिधी :
दि. २३ जुलै २०२५
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे नवीन पर्व म्हणजेच ‘कॉमेडीचं गॅंगवॉर’ येत्या २६ जुलैपासून सुरू होणार आहे. या नव्या पर्वात काही जुने चेहरे अन् काही नवे चेहरे झळकणार आहेत. या शोमध्ये गौरव मोरे, प्रियदर्शन जाधव आणि अभिजीत खांडकेकर यां कलाकारांची एन्ट्री झाली असून श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके हे जुने कलाकारही झळकमार आहे. यादरम्यान अभिनेता प्रियदर्शनने तो या कार्यक्रमात कोणती जबाबदारी निभावणार याविषयी भाष्य केले.
या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात प्रियदर्शन जाधव तिहेरी भूमिकेत दिसणार आहेत. तो लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून काम पाहाणार आहे. २६ जुलैपासून हा कार्यक्रम शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. प्रियदर्शनने सांगितले की ‘फू बाई फू’ पासूनच तो या टीमचा भाग होता. आता ‘चला हवा येऊ द्या’ च्या नवीन पर्वात तो दिग्दर्शन, लेखन आणि अभिनय करणार आहे.
प्रियदर्शनने अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात यश मिळवले आहे. आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो म्हणाला, “जेव्हा ‘फू बाई फू’ सुरू होतं तेव्हापासूनच मी या टीमचा भाग होतो पण काही कारणामुळे मला तो प्रवास पुढे नेता आला नव्हता. पण जेव्हा मला ‘चला हवा येऊ द्याच्या’ नवीन पर्वासाठी विचारण्यात आलं, तेव्हा वाटलं की पुन्हा घरी परतत आहे. माझ्या करिअरमध्ये झी मराठीचा मोलाचा वाटा आहे.”
प्रियदर्शनने कार्यक्रमाच्या तयारीबद्दल माहिती दिली. तो म्हणाला, “तयारी बद्दल बोलायचे झाले तर या शोची काही प्रमाणात दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर आहे, मी काही स्किट लिहणारदेखील आहे आणि अभिनयसुद्धा करणार आहे. अर्थात प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असणार, कारण 10 वर्ष शोने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलंय. आताही प्रेक्षकांची तीच अपेक्षा असणार किंबहुना काही वेगळंही अपेक्षित असेल. ते पूर्ण करायच्या प्रयत्न आम्ही करू.”
प्रियदर्शन पुढे म्हणाला, ‘या पर्वात आम्ही एकटे नसणार, तर आमच्यासोबत काही उभरते हास्य कलाकार असणार आहेत, जे महाराष्ट्राच्या विविध भागातून या मंचावर आले आहेत. या शोचे अस्सल स्टार ते असणार आहेत. या पर्वात माझी भूमिका तिहेरी भूमिका असणार आहे. मी दिग्दर्शनही पाहाणार, स्पर्धकांचे स्कीटही बघणार आणि परफॉर्मही करणार आहे.’
त्याने असेही म्हटले की, “हे सगळं मी एकटा करणार नसून, माझ्या सोबत आणखी काही प्रतिभाशाली लेखक आणि दिग्दर्शक असणार आहेत. आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत. शूटचा पहिला दिवस धमाकेदार होता. भारत, श्रेया, कुशल, गौरवसोबत मज्जा आली. मी कुशल सोबत नाटकात काम केलंय, श्रेयाने माझ्या वेब सिरीज मध्ये काम केलंय, भारत ने माझ्या नाटकात काम केलं आहे, गौरवसोबत काम करण्याचा योग नव्हता आला, पण ती संधी या शोमुळे मिळाली.”
तो पुढे म्हणाला की, “जेव्हा लोकांना कळले की मी हा शो करत आहे तेव्हा शुभेच्छांचे अनेक कॉल आले. प्रेक्षकांचे प्रेम पाहून खूप भारावून गेलोय आणि आता जबाबदारी देखील वाढलीये. आम्ही सगळे खूप मेहनत करत आहोत आणि जसे स्कीट सादर होत आहेत ते पाहून मला खात्री आहे की या पर्वातून आम्ही तोच आनंद पुन्हा देऊ.”