कल्याण प्रतिनिधी :
दि. २३ जुलै २०२५
रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली असताना आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. रिसेप्शनिस्टनंच आधी आरोपी गोकुळ झाच्या वहिनीच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे झानं रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. त्यामुळे तपासात ट्विस्ट आला आहे.
कल्याण मारहाण प्रकरणामधील नव्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रुग्णालयामध्ये घडलेला संपूर्ण प्रकार दिसत आहे. त्यानुसार गोकुळ झा दवाखान्यातील रिसेप्शनिस्ट तरुणीच्या अंगावर धावून जाताना दिसतो. तितक्यात त्याला एक महिला अडवते. त्याला बाहेर घेऊन जात त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर पुढील काही सेकंदात रिसेप्शनिस्ट तरुणी पुढे येते. गोकुळ झाच्या वहिनीच्या थोबाडीत देते. यानंतर संतापलेला गोकुळ झा पुन्हा एकदा दवाखान्यात येतो आणि रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करतो.
परवा संध्याकाळी म्हणजेच २१ जुलैला गोकुळ झा त्याची वहिनी, भाऊ आणि आईसोबत दवाखान्यात गेला होता. तिथले डॉक्टर सहा वाजता आले. त्यानंतर त्यांनी काही रुग्णांना तपासलं. वहिनी सोबत असलेलं बाळ रडत असल्यानं गोकुळ झा डॉक्टरांना भेटण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी डॉक्टर मेडिकल वैद्यकीय प्रतिनिधींशी बोलत होते. त्यामुळे रिसेप्शनिस्ट तरुणीनं गोकुळला आत सोडलं नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
रिसेप्शनिस्ट तरुणीनं आपल्या मुलाला आणि सुनेला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप गोकुळ झा च्या आईनं केला. तिनं सोशल मीडियावर अर्धवट व्हिडीओ शेअर केल्याचा दावादेखील त्यांनी केला. पोलिसांनी झाला ताब्यात घेऊन दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यातील घटनाक्रमामुळे प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ रिसेप्शनिस्टकडून एडिट करण्यात आलेला आहे. मधली काही सेकंद कापून व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. आता हा व्हिडीओ रिसेप्शनिस्ट तरुणीनं एडिट केला की डॉक्टरांनी याचा शोध पोलीस घेत आहेत. तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या गोकुळला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. तिथेही त्यानं गोंधळ घातला.