मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ जुलै २०२५
कथित वादग्रस्त व्हिडीओ तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री अडचणीत आले असून त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याच्या चर्चेला आता तोंड फुटले आहे. संबंधित मंत्र्यांना खरेच डच्चू मिळणार आहे की नाही, याविषयी काहीच निश्चित नसले तरी यामुळे मंत्रिपदाची आकांक्षा बाळगून असलेल्यांच्या आशा मात्र चांगल्याच पल्लवित झाल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील इच्छुक आमदारांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणीही सुरू केल्याचे समजते.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन सहा ते सात महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला नसतानाच जवळपास तीन ते चार मंत्री वादात सापडले आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा त्यांच्याच बेडरूममधील एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये त्यांच्याजवळ पैशांनी भरलेली एक बॅग दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. आपल्याला प्राप्तिकर खात्याची नोटीस आल्याची माहिती खुद्द संजय शिरसाट यांनीच दिली होती. त्यानंतर अधिवेशन संपता संपता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर त्यांच्या मातोश्रींच्या मालकीच्या बारवर धाड पडल्याचे तसेच तिथे बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्याचा आरोप उबाठा पक्षाच्या वतीने करण्यात आला.
अधिवेशन काळातच विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे फोनवर रमी खेळत असतानाचा व्हिडीओ समोर आला. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा हनी ट्रॅपशी संबंधित एका आरोपीसोबतचा फोटो उबाठा पक्षाने व्हायरल करीत त्यांच्यावर आरोप केले आहेत. विरोधकांच्या या आरोपामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा फटका सरकारला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यातील काही अकार्यक्षम, वादग्रस्त मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवू शकतात, अशीही चर्चा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच या घडामोडी घडण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास आपली वर्णी लागावी यासाठी आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते.
राज्यात विरोधकांकडून सातत्याने हनी ट्रॅपचा उल्लेख होत असून त्याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “कुणाकडे हनी ट्रॅपची माहिती आहे ती त्यांनी सरकारकडे द्यावी. यातून नेते, अधिकाऱ्यांविषयी नागरिकांच्या मनात संशय निर्माण होतो. खरोखरीच कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत.”
‘कृषिमंत्र्यांबाबत पुढील आठवड्यात निर्णय’
“माणिकराव कोकाटे यांनी आधी एक ते दोन वेळेस आक्षेपार्ह विधाने केली होती, त्यावेळी मी त्यांच्याशी बोलून, इजा झाले, बिजा झाले आता तिजाची वेळ येऊ देऊ नका, असे म्हटले होते. आता ते विधिमंडळात मोबाइलवर गेम खेळताना दिसले आहेत. सोमवारी किंवा मंगळवारी त्यांना भेटून त्यांचे म्हणणे मी ऐकून घेईन, त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल”, अशी स्पष्ट भूमिका मांडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी कृषिमंत्र्यांवर कारवाईचे संकेत दिले.