जळगाव प्रतिनिधी :
दि. २५ जुलै २०२५
जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथील प्रफुल्ल लोढाला हनी ट्रॅप सह महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात मुंबईत अटक झाली. त्यानंतर जळगावात ‘तो’ कुणाचा सहकारी? यावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरूच आहेत. यात आता प्रफुल्ल याचा मुलगा पवन लोढा याने उडी घेत, माझ्या वडिलांना एकनाथ खडसे व ‘मोठ्या साहेबां’नी अडकविल्याचा आरोप केला आहे. तर लोढाने तोंड उघडू नये म्हणून त्याला पोलिस कोठडीत ठेवल्याचा घणाघात करीत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना पुन्हा डिवचले आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून गिरीश महाजन यांनी लोढा याचा खडसे यांच्यासोबतचा फोटो ‘एक्स’वर पोस्ट करून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ अशी विचारणा केली आहे.
माझ्या वडिलांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते खोटे आहेत. त्यांना एकनाथ खडसे आणि ‘मोठे साहेब’ यांनी अडकवले आहे, असा दावा पवन लोढा याने केला आहे. पोलिसांनी जप्त केलेले पेनड्राइव्ह, सीडी हे सर्व साहित्य माझ्या कामाचे आहे. मी महावितरण कंपनीचे काम करतो. त्यामुळे त्यात माझ्या कामाच्या बाबी आहेत, असे पवनने सांगितले.
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा हा खडसे यांना गुलाब पुष्प देतानाचे छायाचित्र ‘एक्स’वर प्रसारित करीत खळबळ उडवून दिली आहे. संशयित लोढा हा मोटारीत बसलेल्या एकनाथ खडसे यांना गुलाबाचे फूल देतानाचे जुने छायाचित्र त्यांनी पोस्ट केले आहे. सोबतच “एकनाथ खडसे… तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतेय. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात. हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे”, असा मजकूर लिहिला आहे.
“प्रफुल्ल लोढा याच्याकडे असलेले मटेरियल त्यांनी इतरांना देऊ नये आणि तोंड उघडू नये यासाठी त्यांना वारंवार पोलिस कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. प्रफुल्ल लोढा जर बाहेर आले किंवा जामिनावर आले तर, त्यांच्याकडून सत्य निघाल्यास याचा पर्दाफाश होऊ शकतो,’ असा दावा खडसे यांनी केला. ‘याला जेलमध्ये टाका, त्याच्या मागे ईडी लावा, असे करणाऱ्यातला मी माणूस नाही. लढायचे असेल तर आमने-सामने लढा,” असे आव्हानदेखील खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिले आहे