पुणे प्रतिनिधी :
दि. २८ जुलै २०२५
पुण्यातील खराडीतील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग पार्टीवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी पहाटे छापा घालून मोठी कारवाई केली. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई, दोन कुख्यात बुकींसह पाच पुरुष व दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, मंगळवारपर्यंतची (२९ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई खराडीतील स्टेबर्ड अझुर सुट हॉटेलमधील खोली क्रमांक १०२ मध्ये करण्यात आली. आरोपींकडून २.७० ग्रॅम कोकेनसदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा, १० मोबाईल, दोन कार, हुक्का पॉट आणि दारू आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण ४१ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींवर खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, रा. हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, माळवाडी), समीर फकीर सय्यद (वय ४१, एनआयबीएम रस्ता), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, वाघोली), श्रीपाद मोहन यादव (वय २७, आकुर्डी), ईशा देवज्योत सिंग (वय २२, औंध), प्राची गोपाल शर्मा (वय २३, म्हाळुंगे) यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली आहे. उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलमधील तीन रूम डॉ. खेवलकर यांच्या नावे बुक झाल्या होत्या. अटकेपूर्वी आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. पोपटाणी याचा मूळ व्यवसाय सिगारेट वितरणाचा आहे. सय्यदचा हार्डवेअर व्यवसाय असून, यादव बांधकाम व्यावसायिक आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय कुंभार, शैलेश संखे, सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक अस्मिता लाड, राजेश माळेगावे आदींनी केली. वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार याचा तपास करत आहेत.