डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २८ जुलै २०२५
असे म्हटले जात होते की, भारतीय संघ चौथा सामना हारणार. पण भारतीय संघाने टीकाकारांचे तोंड बंद करून, झुंजार फलंदाजी करत सामना ड्रॉ राखला. पण हा सामना भारताने ड्रॉ कसा राखला, याबाबत भारताचा कर्णधार शुभमन गिलने सामना संपल्यावर स्पष्टीकरण दिले. आम्ही एकाच गोष्ट केल्यामुळे आम्हाला या सामन्यात गड कायम राखता आला, असे गिलने सांगितले.
इंग्लंडकडे आघाडी होती ३११ धावांची! त्यात इंग्लंडने भारताचे दोन फलंदाज शून्यावर तंबूत धाडले होते. त्यावेळी इंग्लंड चौथ्या दिवशी सामना जिंकणार असेच सर्वांना वाटत होते. पण त्याचवेळी शुभमन गिल आणि केएल राहुल मैदानात ठामपणे उभे राहीले. दोघांनी संपूर्ण चौथा दिवस खेळून काढला. त्यानंतर पाचव्या दिवशी राहुलचे शतक जरी हुकले, तरी शुभमन गिलने ही कसर भरून काढली आणि १०३ धावांची खेळी साकारली. गिल बाद झाल्यावर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकं झळकावली आणि इंग्लंडला आपल्यापुढे अक्षरशः लोटांगण घालायला लावले. आता हा सामान भारताने कसा फिरवला, हे गिलमे सामना संपल्यावर सांगितले आहे.
गिलने सामना संपल्यावर संगितले की, “गेल्या दोन दिवसांपासून आम्ही पिछाडीवर असल्याने दडपणाखाली होतो. . पण कसोटी सामना ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला बरंच काही शिकवून जाते. नेमकी हीच गोष्ट यावेळी घडली. भारताच्या कामगिरीबाबत मी आनंदी आहे. आम्ही दोन विकेट्स लवकर गमावल्या होत्या. त्यानंतर खेळणे अवघड होते. चौथा दिवस आम्ही खेळून काढल्याने पाचवा दिवस आमच्यासाठी महत्वाचा होता. पाचव्या दिवशी आम्ही प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे हे लक्षात घेतले आणि तो कसा खेळायचा, याचा विचार आम्ही केला. प्रत्येक चेंडूचा आम्ही विचार केल्याने आम्हाला हा सामना ड्रॉ राखण्यात यश आले. फलंदाजांनी खरोखर उत्तम कामगिरी केली आणि त्यामुळेच आम्हाला पाचव्या दिवशीही खेळपट्टीवर टिकून राहाण्यात यश मिळाले.”