मुंबई प्रतिनिधी :
दि. २८ जुलै २०२५
काल शिवसेना उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. उद्धव यांच्या मातोश्री निवासस्थानी जाऊन राज यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तब्बल १३ वर्षांनी राज मातोश्रीची पायरी चढले. काल उद्धव ठाकरेंचा ६५ वा वाढदिवस होता. या दोन नेत्यांच्या भेटीनं या दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. यापूर्वी मुंबईत विजयी मेळाव्यात ५ जुलैला ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यातच आता वाढदिवसानिमित्त राज यांनी उद्धव यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानं दोन बंधूंमधील दुरावा कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीच्या शक्यता ठाकरे बंधूंच्या एकत्रित भेटीगाठी लक्षात घेता वाढल्या आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात याचा सर्वाधिक परिणाम दिसू शकतो. शिवसेना उबाठा आणि मनसेची मुंबई महानगर परिसरात (एमएमआर) ताकद आहे. मनसेची स्थापना झाल्यापासून शिवसेनेला या भागात फटका बसत आला आहे. पण आता हेच दोन्ही पक्ष सोबत येण्याची शक्यता वाढल्यानं महायुतीची चिंता मात्र वाढली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं एमएमआर भागात सर्वेक्षण सुरू केलं आहे.
भाजपचा सर्व्हे सांगतो की, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची युती झाल्यास त्याचा मोठा परिणाम दिसेल. जनमताचा कानोसा घेण्यासाठी दर १५ दिवसांनी भाजप सर्वेक्षण करत आहे. त्यातील सर्वात ताजा सर्व्हे असं सांगतो की, ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना तब्बल ५२ टक्के मतं मिळू शकतात. त्यामुळे साहजिकच महायुतीला फटका बसू शकतो. ठाकरे बंधूंची युती झाल्यास मुंबई महापालिका जिंकण्याचं भाजपचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न अधुरं राहू शकतं हेच यातून समोर येतं.
उद्धव आणि राज ठाकरेंच्या पक्षांची जर झाली नाही, तर त्यांना किती मतं मिळू शकतील, याचाही अंदाज भाजपकडून घेण्यात आला आहे. एमएमआरमध्ये शिवसेना उबाठाला २४ टक्के, तर मनसेला १२.५० टक्के मतं युती न झाल्यास मिळू शकतात. पण हेच दोन पक्ष सोबत आल्यास चित्र वेगळं असेल असं भाजपचा सर्व्हे सांगतो. एका एजन्सीकडून भाजपनं हा सर्व्हे केलेला आहे. या सर्व्हेतील आकडेवारीनं भाजप चिंताग्रस्त आहे.
मुंबई महानगर हा भाग राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. या परिसरात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पनवेल अश्या एकूण ९ महापालिका येतात. त्यामुळे शिवसेना उबाठा आणि मनसेची युती, या महापालिका निवडणुकांमध्ये झाल्यास त्यांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. ही बाब भाजपच्याच सर्वेक्षणातून समोर आलेली आहे हे विशेष.