श्रीनगर प्रतिनिधी :
दि. २८ जुलै २०२५
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मोठी चकमक झाली. भारतीय सैन्य दलाला या चकमकीत तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. श्रावणी सोमवारी राबवलेल्या या मोहिमेला ‘ ऑपरेशन महादेव ‘ असे नाव देण्यात आले आहे. कंठस्नान घातलेले तिघांपैकी दोघे अतिरेकी पहलगाम हल्ल्यातील संशयित असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे, मात्र अद्याप अधिकृत दुजोरा यास मिळालेला नाही. यामुळे समस्त भारतीयांचा ऊर मात्र अभिमानाने भरुन आला आहे.
श्रीनगरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात चकमक झाली. तीन दहशतवाद्यांना आज, सोमवारी झालेल्या या चकमकीत ठार मारण्यात आले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हे ऑपरेशन सुरू केले होते. संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर या विषयावर चर्चा सुरु असतानाच ऑपरेशन महादेव बाबत आनंदवार्ता आली हे विशेष!
‘एक्स’ (ट्विटर) सोशल मीडिया अकाऊण्टवर, भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने यासंदर्भात माहिती दिली. “सातत्याने झालेल्या गोळीबारानंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ऑपरेशन अजूनही सुरु आहे,” असे त्यांनी सांगितले.
हरवानमधील मुलनार भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरु केली. त्यावेळी दोन वेळा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यानंतर अधिक कुमक पाठवण्यात आली. दहशतवाद्यांना मारण्यासाठी शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली होती. एप्रिल महिन्यातील 23 तारखेला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही यामध्ये समावेश होता. ऑपरेशन सिंदूर त्यानंतर काही दिवसांच्या आतच राबवत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते.
दहशतवादी श्रीनगर शहराच्या केंद्रापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या दाचीगाम भागात गेले असावेत, असे गेल्या महिन्याभरातील गुप्तचर माहितीवरुन दिसून आले होते. त्यानंतर भारतीय सैन्यदलाने गुप्त ऑपरेशन राबवून दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे.