मुंबई प्रतिनिधी :
दि. २९ जुलै २०२५
फ्लायओव्हर उतरताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कारने दोन गटांगळ्या घेतल्या. शनिवारी मुंबईतील अंधेरी परिसरात घडलेल्या या अपघातामध्ये एक दाम्पत्य सुदैवाने वाचले ते फक्त आणि फक्त सीटबेल्टमुळे आणि पोलिसांमुळे.
अपघाताच्या पंधरा मिनिटे आधी वाहतूक पोलिसांनी या दाम्पत्याची कार अडवून त्यांना सीटबेल्ट लावण्यास भाग पाडले होते. ‘देवदूत’ म्हणत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांचे या दाम्पत्याने, अपघातातून बचावताच आभार मानले.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातून शनिवारी कारमधून, गोरेगावात राहणारे चाळिशीतील दाम्पत्य गौतम रोहरा आणि त्यांची पत्नी अंधेरीच्या दिशेने चालले होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. अशातच गौतम यांची कार, कलानगरजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांनी थांबवली.
“तुमच्या बायकोने सीटबेल्ट लावलेला नाही. एक हजार रुपये दंड आहे. दंड महत्वाचा नाही पण अपघात घडला तर जीवावर बेतू शकते.” असे सांगून क्षीरसागर यांनी त्यांना सीटबेल्ट लावण्यास भाग पाडले. पुढच्या पंधरा मिनिटांतच आक्रीत घडले आणि गौतम यांची कार अंधेरीच्या फ्लायओव्हर वर पोहोचताच त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पूल उतरत असताना अपघात झाला आणि कारने दोन वेळा पलटी खाल्ली. यामध्ये गाडीचे बरेच नुकसान झाले. पण केवळ सीटबेल्ट लावल्याने, गौतम आणि त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली. “माझ्या बायकोला साधं खरचटलंही नाही. मला किरकोळ जखमा झाल्या आहेत. हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले” असे या अपघातानंतर गौतम यांनी सांगितले.
सीटबेल्ट लावायला पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांनी भाग पाडले नसते तर जीव गेला असता याची जाणीव गौतम आणि त्यांच्या पत्नीला झाली. त्यांनी तात्काळ वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वाहतूक पोलिसांची चौकी गाठली आणि क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. हा सर्व प्रसंग गौतम रोहरा आणि त्यांची पत्नी यांनी समाज माध्यमांवरून शेअर केल्याने मुंबई पोलिसांची वाहवा होत आहे.