मुंबई प्रतिनिधी :
दि. २९ जुलै २०२५
पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ हे ‘विनोदाचा बादशाह’ म्हणून सर्वपरिचित आहेत. पण, काही खलनायकाच्या भूमिकाही अशोक मामांनी गाजवल्या आहेत. त्यांच्या नकारात्मक भूमिकांची वाहवा मराठीमध्येच नव्हे तर हिंदीमध्येही झाली होती. त्यांनी १९९२ साली आलेल्या ‘जागृती’ या चित्रपटात खलनायक साकारला होता. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत होता. अशोक सराफ यांनी अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना एक धक्कादायक किस्सा सांगितला. सलमान खान याने एका सीनमध्ये त्यांच्या मानेवर चाकू पकडला होता आणि तो खरा चाकू होता. अशोक सराफ यांच्या मानेला त्यामुळे जखम झाली होती. हा प्रसंग ते कधीही विसरणार नाहीत असे अशोक सराफ म्हणाले.
याबद्दल पुढे ते म्हणाले की, “एका दृश्यात तो (सलमान खान) मला पकडतो आणि माझ्या मानेवर चाकू ठेवतो आणि तो चाकू खरा होता. त्याच्या टोकाने माझ्या मानेला कापलं गेलं. मी त्यावेळी संवाद म्हणत होतो आणि स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यानेही जोर लावून मला पकडलं होतं. तेव्हा मी त्याला सांगितलं, जरा जपून पकड, माझ्या मानेला कापलं जातंय…” रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
सलमानलाही नेमकं काय करावं ते समजत नव्हतं असं अशोक मामा पुढे म्हणाले. तेव्हा त्यांनी एक युक्ती त्याला सांगितली. अशोक सराफ म्हणाले की, मी त्याला चाकू उलटा पकडायला सांगितलं, आणि म्हटलं की कॅमेरा दूर आहे. तेव्हा तो म्हणाला की, असं केलं तर कॅमेऱ्यात क्लोज सीनमध्ये दिसेल. मी म्हटलं, जाऊदे… तो सीन कसाबसा पूर्ण केला. नंतर मी जेव्हा पाहिलं तेव्हा मानेला जखम झाली होती. ते पुढे म्हणाले की, विचार करा, माझी नस कापली गेली असती तर?’ अशोक सराफ म्हणाले की, ती घटना ते कधीच विसरू शकणार नाहीत. सलमानसोबत ‘जागृती’ या सिनेमात करिष्मा कपूर झळकली होती.
अशोक मामांनी अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘येस बॉस’, ‘करण अर्जुन’, ‘सिंघम’, ‘कोयला’, ‘बेनाम बादशाह’ या हिंदी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.