पुणे प्रतिनिधी :
दि. ३० जुलै २०२५
‘धनराज’, ‘प्रिया’ आणि ‘अनुज’ या त्रिकुटावर, पुण्यात ‘स्पा’च्या आडून मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मकोका) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे खुले आव्हान पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे. पोलिस आयुक्तांनी या तिघांवर मकोका कारवाईचा प्रस्ताव पाठवणाऱ्या पोलिस उपायुक्ताला आणि वरिष्ठ निरीक्षकाला थेट बक्षीस देण्याची घोषणा केली.
सध्या शहरातील वेश्या व्यवसायात, पोलिसांच्या रडारवर असलेले ‘धनराज, प्रिया आणि अनुज’ हे त्रिकुट मुख्य सूत्रधार बनले आहे. ते शंभरहून अधिक स्पा सेंटर चालवत असून, प्रत्यक्षात मात्र त्यामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. अद्याप या टोळीपर्यंत पोहोचण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरली आहे. केवळ व्यवस्थापकांवर कारवाई होते आहे मात्र मुख्य गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात अपयश आले आहे.
संबंधित त्रिकुट नावापुरते स्पा चालवत असून, त्यांची सर्व सूत्रे ‘व्यवस्थापका’कडे सोपवली आहेत, असे पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार समजते. अनेकदा हे व्यवस्थापक ‘बाहेरून आणलेले’ असतात, जे कारवाईत अडकतात, तर मुख्य सूत्रधार मोकाट राहतात. अलीकडेच विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने कारवाई केली, तिच्यात एक अवघ्या 15 वर्षांची मुलगी वेश्याव्यवसायात अडकलेली आढळली. ही सर्वांत धक्कादायक बाब आहे.
केवळ फुटकळ कारवाया सध्या होत असून, मुख्य गुन्हेगारांना अटक होणे लांबच; त्यांच्या नावांवर थेट गुन्हेदेखील दाखल झालेले नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व महिला संघटनांकडून पोलिसांची कारवाई निवडक आणि प्रभावहीन असल्याचा आरोप केला जात आहे. सामाजिक सुरक्षा विभाग बरखास्त करून, पोलिस आयुक्तांनी, मागील वर्षी विशेषतः वेश्याव्यवसायावर कारवाईसाठी ‘मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग’ सुरू केला. मात्र, अपेक्षेप्रमाणे ठोस कारवाईच्या अभावामुळे अनेक स्पा पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत.
सोशल मीडिया, मेसेजिंग अॅप, वेबसाइट्सवरून, ‘बॉडी स्पा’, ‘रिलॅक्सेशन सेंटर’, ‘थाई मसाज’ अशा नावांखाली सर्रास जाहिरात केली जाते. दररोज यातून नवे ग्राहक खेचले जातात. मात्र, असा प्रश्न उपस्थित होत आहे की, पोलिस यंत्रणांनी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे का.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी यावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. या त्रिकुटावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली जाणे अत्यावश्यक आहे असे त्यांनी स्पष्ट केले. हे गुन्हेगारी जाळे उद्ध्वस्त करणार्या कोणत्याही पोलिस उपायुक्त किंवा वरिष्ठ निरीक्षकाला पोलिस दलातर्फे थेट बक्षीस दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.