सातारा प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. ७ जुन २०२१
श्री शिवराज्याभिषेकदिन प्रित्यर्थ शिवसुमन वनस्पतीचे जलमंदिर पॅलेस, सातारा येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत रोपण करण्यात आले. शिवसुमन (फ्रेरिया इंडिका) ही दुर्मिळ, प्रदेशनिष्ठ वनस्पती आहे.
शिवसुमन या वनस्पती बाबत शास्त्रीय माहिती देणारे पत्रक देखील डॉ. सचिन अनिल पुणेकर यांनी सुपूर्त केले. तसेच देशी स्थानिक बियांचा वापर करून साकारलेल्या शिव बीज चित्रातील बियांचे उपस्थित शिवप्रेमींना रोपणासाठी हस्तांतरण देखील करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांवर रचित आरती चे वाचन श्री रायरेश्वर शिवलिंगाचे परंपरागत पुजारी सुनील जंगम यांनी केले. याप्रसंगी गणेश मानकर आणि संजय गोळे उपस्थित होते.
जगाच्या पाठीवर केवळ सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये आढळून येणाऱ्या ‘फ्रेरिया इंडिका’ या वनस्पतीचे दोन वर्षापूर्वी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावरील शिवसदरेवर ‘शिवसुमन’ असे नामकरण करण्यात आले आहे.
फ्रेरिया इंडिका या वनस्पतीला येणाऱ्या फुलांचा रंग भगवा-लालसर असतो. त्यांचा आकार सुदर्शन चक्राप्रमाणे असतो. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी आणि या वनस्पतीचा प्रथम शोधही शिवनेरीवरच लागला हे विशेष. तसेच या वनस्पतीचा प्रादेशिक आढळही सह्याद्री पर्वतरांगांतील गडकिल्ल्यांवरच आहे.
‘शिवसुमन’ची पहिल्यांदा शास्त्रीय नोंद डालझेल या शास्त्रज्ञाने शिवनेरी गडावर केली होती. ही वनस्पती अतिसंकटग्रस्त असून, जगभरात केवळ महाराष्ट्रातच आढळते. सह्याद्री पर्वतरांगामध्ये विशेषत: रंधा धबधबा, जुन्नर, शिवनेरी, सज्जनगड, पुरंदर, वज्रगड, मुळशी, शिवथरघळ, महाबळेश्वर, त्रंबकेश्वर, अंजनेरी अशा निवडक ठिकाणी तीव्र डोंगर-उतार आणि कड्यावर ७५० मी. ते १३५० मी. ऊंचीवर दगडी सुळक्यांवरच व खडकांच्या बेचक्यांतच आढळून येते. पुणे जिल्हाचे निसर्ग प्रतीकात्मक मानचिन्ह फुल म्हणूनही ही वनस्पती ज्ञात आहे.
एकंदरीतच या अलौकिक फुलाचे पर्यावरणीय व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या वनस्पतीचा संवर्धनाचा कार्यक्रम देखील डॉ. सचिन पुणेकर आणि त्यांच्या बायोस्फिअर्स या सेवाभावी संस्थेने हाती घेतला आहे. भविष्यात या वनस्पतीचे रोपण स्वराज्यातील विविध गडकोटांवर व छत्रपती शिवरायांशी निगडीत असलेल्या स्थानांवर नागरिकांच्या सहभागातून केले जाईल…!