पुणे प्रतिनिधी :
दि. ३० जुलै २०२५
अद्याप पोलिसांना, खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील ड्रग पार्टी प्रकरणात अटक आरोपींना कोकेन व गांजाचा पुरवठा करणारा ‘ड्रग पेडलर’ सापडलेला नाही. दरम्यान पोलिसांच्या तपासात, या हॉटेलमध्ये एप्रिल व मे महिन्यातही ‘हाऊस पार्टी’ झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महिलांशी चॅटिंगसह पार्टीची छायाचित्रे व चित्रफिती आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. प्रांजल मनीष खेवलकर (वय ४१, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर) याच्यासह निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, रा. डीएसके सुंदरबन, माळवाडी रस्ता), श्रीपाद मोहन यादव (वय २७, रा. पंचतारानगर, आकुर्डी), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, रा. द्वारकानगर, वाघोली), समीर फकीरमहंमद सय्यद (वय ४१, रा. पॅलेस ऑर्किड सोसायटी, एनआयबीएम रस्ता), ईशा देवज्योत सिंग (वय २२, रा. कुमार बिर्ला सोसायटी, औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (वय २३, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, म्हाळुंगे) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. अमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. खराडी पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर डॉ. प्रांजल खेवलकरसह पाच जणांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. दोन तरुणींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात, आरोपींच्या शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पार्टीत हुक्का तयार करण्यासाठी राहुल नावाचा व्यक्ती आल्याचे निष्पन्न झाले आहे. सरकारी वकील अमित यादव यांनी, पार्टीत आणखी कोणाचा सहभाग होता, याबाबत तपास करायचा आहे, असा युक्तिवाद केला. तपासातील प्रगती खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांनी अधोरेखित केली.
यापूर्वी एप्रिल व मे महिन्यात या हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीचाही तपास करायचा असून, त्यामध्ये कोण सहभागी होते, याबाबत आरोपींची चौकशी केली जाणार आहे. याशिवाय आरोपींचे दहा मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून, ते सायबर तज्ज्ञांकडून तपासण्यात येत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा व डॉ. प्रांजल यांच्या पत्नी रोहिणी खडसे या सुनावणीला न्यायालयात हजर राहिल्या. रोहिणी खडसे यांनी वकिलांचा पोशाख परिधान केला होता. त्या पेशाने वकील आहेत. सुनावणी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया त्यांनी दिली, “हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. माझा न्यायालयावर विश्वास आहे.”