पुणे प्रतिनिधी :
दि. ३१ जुलै २०२५
‘भारत फोर्ज’चे उपाध्यक्ष व सह व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी यांच्याविरोधात, नामांकित कल्याणी समूहातील एका कंपनीत कार्यरत वरिष्ठ लेखापालाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे, त्या लेखापलाने चिठ्ठीत लिहिले होते. या संदर्भात दाखल गुन्ह्याची नव्याने चौकशी करण्याचा आदेश खेड-राजगुरुनगर अतिरिक्त सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी दिला आहे.
20 ऑगस्ट 2017 रोजी चाकण येथील एका हॉटेलमध्ये, कल्याणी समूहातील ‘कल्याणी टेक्नोफोर्ज लिमिटेड’ (केटीएफएल) कंपनीचे वरिष्ठ लेखापाल नीलेश अशोक गायकवाड, वय 32 वर्ष, रा. कोंढवा, यांनी आत्महत्या केली. अमित कल्याणी यांच्यावर त्यांनी तत्पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गंभीर आरोप केले होते. गायकवाड यांच्या भावाने या घटनेनंतर चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने, या प्रकरणी चौकशीअंती ठोस पुरावे न मिळाल्याचे सांगत ‘क्लोजर रिपोर्ट’ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर केला. १३ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयाने हा अहवाल स्वीकारला होता. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयात, गायकवाड यांच्या पत्नी व भावाने फेरविचार याचिका दाखल केली होती.
अमित कल्याणी यांनी खेड-राजगुरुनगर अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. ‘एफआयआर’ खोटा असल्याचा निष्कर्ष ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी करून काढला आहे. त्यांचा ‘क्लोजर रिपोर्ट’ही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने स्वीकारला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा या प्रकरणी घडला नसल्याचे या न्यायालयाने म्हटले आहे.
‘सत्र न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देऊन आमची बाजू ऐकून न घेता काही मुद्द्यांवर चौकशीचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यांचा प्रयत्न केवळ अमित कल्याणी यांना त्रास देऊन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा आहे. वास्तविक कल्याणी समूहाच्या कंपनीतून आठ कोटींची रक्कम वैयक्तिक खात्यात या लेखापालाने लॉटरी व सट्टेबाजीसाठी वर्ग केली असून, याबाबत मुंढवा पोलिसांनी लष्कर न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे,’ असे अमित कल्याणी यांच्या वकिलांनी नमूद केले.