छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी :
दि. ३१ जुलै २०२५
एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल सुनावत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं आहे की केवळ संशयामुळे आरोपींना दोषी धरता येणार नाही. तब्बल १७ वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर दोन्ही बाजूने विविध प्रतिक्रिया उमटत असून एआयएमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तत्कालीन राज्य सरकारसह या प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना निवडणुकीत तिकीट देणाऱ्या भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “एका समाजात दहशत निर्माण करण्यासाठी आणि समाजात धार्मिक दुफळी निर्माण करण्यासाठी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. सगळेच निर्दोष आहेत तर मग बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला?” असा खडा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.
न्यायालयाच्या निकालावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, “सुरुवातीला मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हेमंत करकरे हे काम पाहत होते. हेमंत करकरे यांची देशातील एक चांगले अधिकारी अशी ओळख होती. पण दुर्दैवाने नंतर त्यांचा मृत्यू झाला. हे सगळं प्रकरण त्यांनी बाहेर काढलं होतं. मात्र त्यांची हत्या करण्यात आली. हिंदू दहशतवाद असा एक शब्द मालेगाव घटनेच्या नंतर समोर आला होता. समाजात धार्मिक दुफळी निर्माण करण्यासाठी आणि एका समाजात दहशत निर्माण करण्यासाठी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरंच निर्दोष असत्या तर त्यांना तुरुंगात टाकण्याची हिंमत कोणामध्ये होती? तसंच आजच्या निकालाप्रमाणे तेव्हा आर्मीत सक्रिय असणारे लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांना कोणी अडकवलं? देशाच्या सर्व न्यायालयीन प्रक्रियेवर या निकालामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भाजपने या बॉम्बस्फोट प्रकरणाचा राजकीय फायदा उचलण्यासाठी भोपाळसारख्या एका राज्याच्या राजधानीत साध्वी प्रज्ञासिंह यांना तिकीट देऊन निवडून आणलं, त्यांची पात्रता काय होती? त्यांची पात्रता एवढीच होती की, त्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या आरोपी होत्या. आमच्याकडे आता काही चांगले लोक राहिलेले नाहीत, जे आरोपी आहेत त्यांना आम्ही तिकीट देऊन लोकसभेत बसवणार, असा मेसेज भाजपकडून देण्यात आला होता,” असा घणाघात जलील यांनी केला आहे.
“ही घटना घडली तेव्हा आर. आर. पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, तसंच विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण हे नेते काही काळ मुख्यमंत्री होते. त्यांनी असं ठरवलं होतं का की, कोणतीही अशी घटना घडल्यास आपण कोणालाही पकडून आणू आणि मग ही केस अशीच चालत राहील,” असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करताना विशेष एनआयए न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. “सरकारी पक्षाला या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे फक्त संशयावरून आरोपींना दोषी धरलं जाऊ शकत नाही. सरकारी पक्षाच्या आरोपांवर विसंबून राहून आरोपींना दोषी धरणं चुकीचं होईल. त्यामुळे संशयाचा फायदा देऊन आरोपींना निर्दोष मुक्त केलं जात आहे,” असं न्यायालयाने म्हटलं आहे.