नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ०४ ऑगस्ट २०२५
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन झाले. नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. किडनीच्या आजारामुळे गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती नाजूक होती आणि ते व्हेंटिलेटरवर होते. शिबू सोरेन यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिबू सोरेन यांच्या निधनाने झारखंडच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कोण होते शिबू सोरेन?
शिबू सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य होते आणि त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष केला. शिबू सोरेन यांना झारखंडमध्ये ‘गुरुजी’ म्हणून ओळखले जाते. शिबू सोरेन यांनी स्वतंत्र झारखंड राज्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. ते तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले.
शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाने आदिवासी भागांमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृतीचे अभियान चालवले. राज्याला वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
शिबू सोरेन यांनी तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवले. सर्वात आधी २००५ मध्ये दहा दिवसांसाठी (०२ मार्च ते १२ मार्च), नंतर २००८ ते २००९ या काळात त्यांनी दुसऱ्यांदा धुरा सांभाळली. त्यानंतर पुन्हा २००९ ते २०१० या काळापर्यंत त्यांनी झारखंडचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं.
त्यांच्या निधनाची बातमी पसरताच झारखंडमध्ये शोककळा पसरली. राजकीय आणि सामाजिक संघटनांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
“गुरुजींचे जाणे हे झारखंडच्या राजकारणातील एका युगाचा अंत आहे. त्यांच्या योगदानाला भावी पिढ्या नेहमीच लक्षात ठेवतील. शिबू सोरेन यांनी झारखंडच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठे योगदान दिले. आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेले कार्य नेहमीच स्मरणात राहील. झारखंडला एक नवी ओळख मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.” अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.