मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ ऑगस्ट २०२५
२२ जानेवारी २०१० मध्ये अवधूत गुप्ते निर्मित आणि दिग्दर्शित ‘झेंडा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. मराठी इंडस्ट्रीमध्ये ज्यावर बोलण्याचीही कुणाची तयारी नव्हती त्या विषयावर अवधूत गुप्तेनं सिनेमा तयार केला आणि तो गाजलासुद्धा. ‘झेंडा’ या सिनेमात महाराष्ट्राच्या राजकारणाची सत्यस्थिती दाखवण्यात आली होती. हा सिनेमा जरी काल्पनिक म्हटला गेला असला तरीसुद्धा त्याचा विषय आणि रोख प्रेक्षकांना समजला होता. राजकारणामुळे दोन भावांमध्ये आणि पक्षात झालेली फूट या सिनेमात दाखवण्यात आली होती. ‘झेंडा’ या सिनेमामध्ये सिद्धार्थ चांदेकर, संतोष जुवेकर , चिन्मय मांडलेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र, हा सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदर मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्याबद्दल संतोष जुवेकरनं एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
संतोष जुवेकरने ‘झेन एंटरटेनमेंट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘झेंडा’ या सिनेमाचा किस्सा सांगितला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या सिनेमाला विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वतः सिनेमा प्रदर्शित करण्यास सांगितलं, असं संतोषने म्हटलंय. मुलाखतीदरम्यान संतोष जुवेकर म्हणाला की, ‘त्या काळात राजसाहेबांनी खूप सपोर्ट केला होता. म्हणजे ज्या व्यक्तीचं, ज्याचं आम्हाला टेन्शन आलं होतं, की हा सिनेमा आल्यानंतर कदाचित आम्हाला फटके पडतील किंवा आपला सिनेमा रद्द होईल, त्याच व्यक्तीनं सांगितलं होतं, जर माझं नाव किंवा मला जर व्हिलन दाखवून मराठी सिनेमा मोठा होणार असेल तर मला काही हरकत नाही. मराठी सिनेमा मोठा होऊ दे.’
“मला आठवतं वंदना टॉकीजच्या बाहेर, शो बंद पाडा असं म्हणणारे उभे होते. मी आणि अवधूत तिथे गेलो होतो. तिथे मनसेचे कार्यकर्ते आले होते. आम्ही तिथे गेलो आणि तिथून आम्ही फोन केला, अमेय खोपकरला, तिकडून फोन आला साहेबांचा. पिक्चर चालू करायचा, बाजूला व्हा. आणि ते सगळे आतमध्ये येऊन बसले पिक्चर बघायला. पूर्ण पिक्चर जे बंद करायला आले होते, ते आमच्यासोबत बसले, पूर्ण सिनेमा पाहिला आणि बाहेर येऊन बोलले की, नाही हो चांगला आहे हा सिनेमा.” असं संतोषने पुढे सांगितलं.