डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. ०५ ऑगस्ट २०२५
भारताने ओव्हल कसोटीत इंग्लंडला पराभूत करत पाच सामन्यांची मालिका २-२ ने बरोबरीत आणली आणि जबरदस्त पुनरागमन केले. अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेला थरार सिराजच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताच्या बाजूने झुकला.
सिराजने इंग्लिश फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला लावलं. पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट घेत त्याने एकूण ९ बळी टिपले. ४६.३ षटकांत १२० धावा देत त्याने सामना भारताच्या पारड्यात टाकला.
सामना संपल्यानंतर सर्वांचे लक्ष गेले सिराजच्या एका खास प्रतिक्रियेवर. डेल स्टेनने एक्सवर लिहिलं होतं – “सिराज आज ५ विकेट घेणार!” याचे प्रत्युत्तर देताना सिराजने लिहिलं – “आपने कहा, और मैंने डिलीवर किया!” यावरून सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक केलं जातंय.
विराट कोहलीने ट्विट करत म्हटलं – “सिराज आणि प्रसिद्धच्या धैर्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला. संघासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सिराजचा विशेष गौरव.”
सौरव गांगुली म्हणाला – “टीम इंडिया जबरदस्त! कसोटी क्रिकेटचं खरे सौंदर्य ओव्हलवर दिसलं. शुभमनच्या नेतृत्वाखाली सर्वांचे अभिनंदन.”
तर सचिन तेंडुलकरने म्हटलं – “सर्वोत्तम क्रिकेट! मनाला भिडलेली कामगिरी. मालिका २-२, आणि भारताचा सुपरमॅन सिराज!”