डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी
दि. ०५ ऑगस्ट २०२५
जेव्हा संघ हरतो, तेव्हा सर्वात आधी बोटं वळतात प्रशिक्षकाकडे — आणि भारतासाठी ते नाव होतं, गौतम गंभीर. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळाडूंच्या निवडीवरून त्यांच्यावर टिकेची झोड उठली. कुलदीप, अर्शदीप यांना संधी न दिल्याबद्दल, करुण नायरला संधी दिल्याबद्दल आणि मधल्या डावात भारत संकटात असताना गंभीर ट्रोल झाले.
पण भारताने पाचवी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत आणली आणि विजयाच्या क्षणी शांत गंभीरने एका वाक्यात सर्व टीकाकारांना थांबवलं.
गंभीर यांनी सोशल मीडियावर टीम इंडियाच्या विजयाचे चार फोटो शेअर करत लिहिलं:
“आम्ही काही सामने जिंकू, काही हरू… पण शरणागती कधीच पत्करणार नाही. वेल डन बॉईज!”
हे वाक्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. न बोलता खूप काही सांगणारा हा टोला होता, जो नेमका टिक्यांवर आदळला.
विराट, रोहित, अश्विन यांच्याशिवाय – आणि बुमराह, पंतसारखे स्टार्स नसतानाही – टीम इंडियाने ही लढाई जिंकली. भारताने न फक्त सामना वाचवला, तर सामना जिंकून दाखवला – ‘हरणं परवडेल, पण लढणं थांबणार नाही’ ही भावना टीम इंडियाने दाखवून दिली, आणि तिचं प्रतिनिधित्व केलं गंभीर यांच्या एका वाक्यानं!