ठाणे प्रतिनिधी :
दि. ५ ऑगस्ट २०२५
मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. जाधव यांच्या म्हणण्यानुसार, निवृत्तीच्या शेवटच्या आठवड्यात ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडून लोढा यांनी कथित राजकीय दबाव टाकून फायली मंजूर करून घेतल्या.
जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत चौकशीची मागणी केली आणि पत्रकार परिषदेत दावा केला की –
“२५ ते ३१ जुलैदरम्यान अनेक फायली वेगाने मंजूर झाल्या. यातील काही फायली जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन मंजूर करून घेतल्याची माहिती आहे. हे प्रोटोकॉलविरोधी असून गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे.”
त्यांनी असा सवाल उपस्थित केला की –
“कित्येक महिने रखडलेल्या फायली अचानक शेवटच्या आठवड्यात मंजूर कशा झाल्या? आणि लोढा जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी का गेले?”
जाधव यांचा आरोप आहे की, लोढा यांच्या ‘लोढा डेव्हलपर्स’ आणि ‘मायकोट्रेक’ कंपन्यांच्या संबंधित १३ फायली विविध विभागांतून मंजूर झाल्या असून त्यामागे राजकीय हस्तक्षेप होता का, याची चौकशी झाली पाहिजे.
“मंत्रिपदाचा गैरवापर झाल्याचा संशय असून, मुख्यमंत्री फडणवीस व नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
जाधव यांनी ही मागणी करताना ठाणे ग्रामीण भागातील अटकलेल्या संपत्तींच्या फायलींना अचानक मंजुरी मिळाल्याचे नमूद केले आणि सर्व फायली परत बोलवून पुनर्परीक्षण करण्याची मागणी केली.