मुंबई प्रतिनिधी :
दि. ०६ ऑगस्ट २०२५
दादर येथील कबुतरखान्यावर बंदी घालण्यात आल्याने जैन बांधवांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान काही महिलांनी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री चाकूने फाडून आत प्रवेश केला. यानंतर मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घटनास्थळी भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसोबतच ट्रस्टींशीही चर्चा केली. आंदोलन चुकीचे होते, असे सांगतानाच त्यांनी यामध्ये ‘बाहेरच्या लोकांचा सहभाग होता’ असा दावा केला.
मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?
मंत्री लोढा यांनी घटनास्थळी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, “काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बैठक घेऊन सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकले आणि योग्य निर्णय दिला. हा विषय केवळ हायकोर्टात प्रलंबित नाही, तर तो लोकांच्या आरोग्याशीही निगडित आहे. तरीही आज सकाळी जे घडलं, ते अयोग्य होतं, म्हणूनच मी स्वतः पाहणीसाठी आलो.”
“माझी सर्व मुंबईकरांना विनंती आहे की, त्यांनी शांतता राखावी. कायदा हातात घेऊ नये. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उद्या कोर्टात काय निर्णय होतो, ते पाहूया, तोपर्यंत संयम पाळावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
लोढा पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय घेताना कबुतरांचा मृत्यू होऊ नये, याची काळजी घेतली आहे. पण नागरिकांच्या आरोग्याचीही तितकीच चिंता आहे. यासाठी महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.”
यानंतर लोढा जैन मंदिरातील विश्वस्तांची भेट घेण्यासाठी गेले. त्यावेळी जैन समाजाने आपले आंदोलन मागे घेतले. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना लोढा म्हणाले, “मला सूचना मिळताच मी तातडीने आलो. सकाळी जे काही घडलं ते अयोग्य होतं. अधिकार्यांशी व ट्रस्टींशी बोलताना त्यांनी सांगितले की आंदोलनात बाहेरचे लोक सहभागी होते. ट्रस्टींनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून, जैन साधूसंत वा समाजाचे प्रमुख आजच्या आंदोलनात सहभागी नव्हते. तरीही त्यांनी खेद व्यक्त केला आहे. कायदा कोणाच्याही हातात जाऊ देऊ नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.