मुंबई प्रतिनिधी
दि. ०६ ऑगस्ट २०२५
मुंबईतील प्रसिद्ध दादर कबूतरखाना बंद करण्यात आला असला तरी तिथे येणाऱ्या कबूतरांनी मात्र हा बदल अजूनही स्विकारलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तब्बल ९० वर्षांपूर्वी सुरू झालेला कबूतरखाना बंद करण्यात आला असून, त्यावर आता काळ्या रंगाचे छत बसवले गेले आहे. मात्र शेकडो कबुतरे अजूनही दररोज याच ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून जैन आणि गुजराती समाजातील नागरिक इथे रोज कबूतरांना दाणे टाकत होते. त्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचे बनले होते. परंतु, या कबूतरांमुळे परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. कबूतरांची पिसं, विष्ठा आणि सततची गर्दी यामुळे श्वसनविकार, त्वचारोग, तसेच प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला होता.
स्थानिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तज्ज्ञ अहवाल व सादर केलेले पुरावे पाहून उच्च न्यायालयाने कबूतरखाना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने कारवाई करत कबूतरखाना बंद केला.
मात्र, ही माहिती त्या कबूतरांपर्यंत पोहोचवणार कोण? दररोज दाण्याच्या शोधात येणारी ही शेकडो कबुतरे अजूनही दादर चौकात गर्दी करत आहेत. अनेक कबुतरे आता परिसरातील इमारती, गॅलऱ्या आणि झाडांवर थांबताना दिसत आहेत. थवेच्या थवे उडताना पाहून स्थानिक म्हणत आहेत – “कबूतरखाना बंद झाला, पण हे कबूतरांना कसं समजवायचं?”
मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासन आता या पक्ष्यांच्या स्थलांतरासाठी उपाययोजना करतील का? की या कबुतरांचा दादरमधील मुक्काम असेच सुरू राहणार? हा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.