मुंबई प्रतिनिधी
दि. ०६ ऑगस्ट २०२५
टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवच्या आरोग्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्पोर्ट्स हर्नियामुळे झालेल्या शस्त्रक्रियेनंतर सूर्या प्रथमच सरावाला परतला असून, आशिया कप 2025पूर्वी मैदानात उतरेल का, यावर अजूनही अनिश्चितता कायम आहे.
जुलै महिन्यात जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर सूर्यकुमार यादव सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय निगराणीखाली आहे. गेल्या आठवड्यात तो बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करताना दिसला होता. बीसीसीआयने अधिकृतरित्या सांगितले की, “सूर्या हळूहळू तंदुरुस्त होत आहे आणि आशिया कपसाठी वेळेत फिट होण्यासाठी प्रयत्नशील आहे.”
बांगलादेश दौऱ्यावरून थेट आशिया कपकडे?
सूर्यकुमार यादवने ऑगस्ट महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत पुनरागमन करणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र ही मालिका २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे, आता त्याचे थेट आशिया कप 2025मध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर दुलीप ट्रॉफीतील पश्चिम विभागाच्या संघात सूर्यकुमारचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आरोग्याच्या कारणामुळे त्याला ही स्पर्धा देखील गमवावी लागली. पुनर्वसन प्रक्रियेसाठी त्याने नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये हजेरी लावली आहे.
पश्चिम विभागाचे नेतृत्व शार्दुलकडे
सूर्याच्या अनुपस्थितीत दुलीप ट्रॉफीतील पश्चिम विभागाच्या संघाचं नेतृत्व शार्दुल ठाकूरकडे देण्यात आलं आहे. या संघात श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान यांसारखे अनुभवी खेळाडूही सहभागी आहेत.
आशिया कपमधील पाकिस्तान सामना वादात
आशिया कप 2025 यंदा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे 9 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र, भारत-पाकिस्तान सामन्याबाबत वाद निर्माण झाला आहे. काही गटांनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास विरोध दर्शवला आहे, तर काहींनी मैदानात उतरून पाकिस्तानला पराभूत करण्याचा सूर लावला आहे.
विशेष म्हणजे, भारताने जर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, तर याचा थेट परिणाम ऑलिंपिक पात्रतेवर होऊ शकतो, अशी चिंता क्रिकेट विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
कर्णधार कोण? निर्णय लवकरच!
सूर्यकुमार यादव जर वेळेत पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही, तर आशिया कपसाठी भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद कोणाकडे दिले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर किंवा शुभमन गिल यापैकी कोणाला ही जबाबदारी दिली जाईल, याचा निर्णय बीसीसीआयकडून लवकरच घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.