नवी दिल्ली प्रतिनिधी
दि. ०६ ऑगस्ट २०२५
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या विरोधाभासी वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर Tariff (कर) वाढवण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांना जेव्हा भारतानेच प्रतिप्रश्न केला – “मग अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम आणि खते का आयात करते?” – तेव्हा ट्रम्प यांचं उत्तर मात्र बालिशच ठरलं. “मला माहित नाही, मला तपासावं लागेल,” असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
भारतावर टीका, स्वतःचा विसर
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याचा मुद्दा उचलून ट्रम्प यांनी भारताला लक्ष्य केलं होतं. त्यांनी रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर १०० टक्के आयात कर लावण्याचा इशारा दिला. मात्र, जेव्हा त्यांच्याच देशाने रशियाकडून युरेनियम, खतं, रसायनं आणि पॅलेडियमसारख्या वस्तू आयात केल्याचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा ट्रम्प यांनी ‘मला काहीच माहित नाही’ अशी प्रतिक्रिया दिली.
भारताने घेतली ठाम भूमिका
ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारतानेही आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं की, “कोणत्याही सार्वभौम देशाप्रमाणे भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेत असतो. भारताला लक्ष्य करणं अन्यायकारक आणि दुटप्पीपणाचं लक्षण आहे.”
भारताने पुढे नमूद केलं की, अमेरिकाच अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात समृद्ध युरेनियम, खते आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेलं पॅलेडियम आयात करत आहे. त्यामुळे भारताच्या तेल खरेदीवर प्रश्न उपस्थित करणं हास्यास्पद आहे.
ट्रम्प यांचं गोंधळलेलं उत्तर
व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या 2028 लॉस एंजेलिस ऑलिंपिकविषयीच्या पत्रकार परिषदेत जेव्हा ट्रम्प यांना भारताच्या प्रश्नाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं –
“मला काही माहिती नाही… तपासावं लागेल.”
ते पुढे म्हणाले, “मी टक्केवारी कधी सांगितली नाही. पण आम्ही यावर मोठं पाऊल उचलू. उद्या आमची रशियाशी बैठक आहे, काय होतं ते पाहू.”
अमेरिका-रशिया व्यापाराचे वास्तव
रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यानंतर तीन वर्षांनंतरही युद्ध संपलेलं नाही. तरीही अमेरिका अब्जावधी डॉलरचा रशियन माल आयात करत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 पासून अमेरिकेने $24.51 अब्ज किमतीच्या रशियन वस्तू आयात केल्या आहेत तर केवळ 2024 मध्ये वॉशिंग्टनने मॉस्कोमधून $1.27 अब्जचे खत, $624 दशलक्षचे युरेनियम आणि प्लुटोनियम व जवळजवळ 878 दशलक्ष डॉलर्स किमतीचे पॅलेडियम आयात केले.
.