पुणे प्रतिनिधी
दि. ०६ ऑगस्ट २०२५
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या झेड ब्रिजजवळ मंगळवारी रात्री उशिरा गँगवॉरसदृश हिंसक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वैमनस्यातून कोयत्याने एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कोयत्याने थेट हल्ला, वाहनांचीही तोडफोड
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता ही घटना घडली. दोन तरुण मोपेडवरून जात असताना त्यांच्या मागे काहीजण पाठलाग करत होते. ते झेड ब्रिजजवळ थांबले, तेवढ्यात पाच ते सहा हल्लेखोर दुचाकींवरून आले आणि थेट कोयत्याने हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी केवळ त्या तरुणांवरच नव्हे, तर त्यांच्या वाहनावरही कोयत्याने जोरदार वार करत तोडफोड केली. काही हल्लेखोर आधीच दबा धरून बसल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित होता, असा पोलिसांचा संशय आहे.
परिसरात भीतीचं वातावरण
हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. रस्त्यावर उघडपणे कोयते घेऊन फिरणाऱ्या टोळक्याने काही अन्य वाहनांवरही दगडफेक व तोडफोड केल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवर्ती, वर्दळीच्या भागात घडलेला हा प्रकार पोलीस यंत्रणेसाठी गंभीर इशारा मानला जात आहे.
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे.
प्राथमिक कारण – जुना वाद?
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यामागे जुना वाद कारणीभूत असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जखमी युवकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.