बीड प्रतिनिधी
दि. ०७ ऑगस्ट २०२५
भाजप नेत्या पंकजा मुंडेंना राजकारणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचे कट्टर समर्थक आणि बीड जिल्ह्यातील प्रभावी नेते राजाभाऊ मुंडे व त्यांचा मुलगा बाबरी मुंडे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. वडवणी येथे आयोजित मेळाव्यात सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या घडामोडीने बीडमधील राजकीय समीकरणं ढवळून निघण्याची शक्यता आहे. राजाभाऊ मुंडेंच्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
या पार्श्वभूमीवर राजाभाऊ मुंडेंनी स्पष्ट भूमिका घेत आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, “बीड जिल्ह्याचा विकास खुंटत चालला आहे. अजित पवारांनी या भागावर विशेष लक्ष दिले आहे, म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
यावेळी बोलताना त्यांनी पंकजा मुंडेंवरही अप्रत्यक्ष टोला लगावला. “मी त्यांची साथ सोडतोय, तरी त्यांनी एकदाही मला कॉल केला नाही,” असे सांगत त्यांनी संबंधातील दुरावा सूचित केला. तसेच “आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा प्रवेश करत आहोत,” असेही ते म्हणाले.
वडवणीतील कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अजित पवारांचे स्वागत बॅनर झळकले असले तरी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो कुठेही दिसला नाही. यावरही राजाभाऊ मुंडेंनी स्पष्ट उत्तर दिलं – “जर धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असते तर फोटो लावला असता. पण गरज वाटली नाही, म्हणून लावला नाही.”
या संपूर्ण घडामोडींमुळे बीडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून येत्या काळात अजून काही धक्कादायक निर्णय समोर येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.