मुंबई प्रतिनिधी
दि. ०७ ऑगस्ट २०२५
मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याआधी साऊथ फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. मात्र त्या प्रवासात तिला एक अत्यंत अपमानास्पद अनुभव देखील सहन करावा लागला, याचा तीने अलीकडेच एका मुलाखतीत भावनिक पद्धतीने खुलासा केला.
ईशा एका तेलुगू सिनेमाच्या चित्रीकरणावेळी झालेल्या प्रसंगाबद्दल सांगत होती. ‘वाईफ ऑफ व्ही वारा प्रसाद’ या चित्रपटातल्या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा हा अनुभव होता. डिजिटल कमेंटरीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “तेव्हा मी फक्त दोन साऊथ सिनेमे केले होते. बॉलिवूडमध्ये यायच्या आधीची ती गोष्ट आहे. मी नाचण्याच्या बाबतीत अजून शिकत होते.”
“या बॉलिवूडमधून येतात आणि काहीही येत नाही त्यांना!”
गाण्याच्या सरावादरम्यान एका साऊथ कोरिओग्राफरने तिला सर्वांसमोर अपमानित करत म्हटले, “या मुली बॉलिवूडमधून येतात. त्यांना काहीही येत नाही. कळत नाही यांना घेतातच का? जर तुला नाचता येत नसेल, तर इथे का आलीस?”
ईशा म्हणाली, “हे ऐकून मला फार वाईट वाटले. मी मेकअप व्हॅनमध्ये जाऊन भरपूर रडले.” मात्र त्या अपमानाचे दुःख न कुरकुरता तिने त्याचेच रूपांतर प्रेरणेत केले. “मी ठरवलं की आता कुणालाही मला पुन्हा असं बोलण्याची संधी देणार नाही.”
सरोज खानच्या असिस्टंटकडून घेतला डान्सचा धडा
ईशा पुढे सांगते, “मी सरोज खान यांची असिस्टंट उषा ताई यांना फोन केला आणि म्हटलं — मला डान्स शिकायचा आहे. तुम्ही मला सरोजजींच्या गाण्यांवर नाच शिकवा.” त्यानंतर उषाजी दररोज तिच्या घरी येऊन तिला मेहनतपूर्वक नृत्य शिकवू लागल्या.
आज ईशा कोप्पीकर नृत्य, अभिनय आणि सौंदर्य यांचे उत्तम उदाहरण मानली जाते. तिच्या संघर्षाच्या या आठवणी अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात.