मुंबई प्रतिनिधी
दि. ०७ ऑगस्ट २०२५
राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासून शिस्त आणि देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) धर्तीवर सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली.
या बैठकीत NCC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्यातील विस्तार, प्रशिक्षण केंद्रे आणि प्रशिक्षकांची संख्या यावर सविस्तर चर्चा झाली. राज्यात सध्या ७ ग्रुप्स आणि ६३ युनिट्स असून त्यामार्फत १,७२६ शाळा आणि महाविद्यालयांतील १.१४ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
अधिकाधिक विद्यार्थ्यांना NCC प्रशिक्षणासाठी प्रयत्न
दादा भुसे म्हणाले, “राज्यातील अधिकाधिक शाळांमध्ये NCC ची प्रशिक्षण केंद्रे सुरू होण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना देशाविषयी आदर आणि शिस्त लागावी, या हेतूने हे प्रशिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, “यंदाच्या स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीतांवर कवायती सादर केल्या जातील. यासाठी एनसीसी प्रशिक्षणाचा लाभ होईल.”
माजी सैनिकांचा उपयोग प्रशिक्षणासाठी
विद्यार्थ्यांना प्रभावी प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीने माजी सैनिकांची मदत घेण्याचाही सरकारचा मानस आहे. यामुळे प्रशिक्षण अधिक शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
राज्य सरकारचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा
राज्यातील एनसीसी प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढवण्यासोबतच प्रशिक्षकांची उपलब्धता, आवश्यक पायाभूत सुविधा यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहितीही भुसे यांनी दिली.
दादा भुसे यांच्या या घोषणेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणाचाच नव्हे तर शिस्त, नेतृत्वगुण, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीची जाण याचाही लाभ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.