पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि.०८ जुन २०२१
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दिनांक 11 जून 2021 पासून संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी काढण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची आरटीई अंतर्गत निवड यादीत सोडत लागली आहे त्या पालकांनी शाळेत जाऊन विहित मुदतीत प्रवेश निश्चित करुन घ्यावा, असे आवाहन प्राथमिकचे शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी केले आहे.
सर्व शाळांनी सन 2021-22 या वर्षाची आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक 11 जून पासून सुरु करावी. जिल्हयातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेवून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरुन घेण्यात यावा व तशा सूचना प्रसिध्द करण्यात याव्यात. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता 20 दिवसांचा कालावधी देण्यात यावा, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करु नये. शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे त्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर द्यावा. ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्यांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.
बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात त्यामुळे रहिवासी पत्याचा पुरावा इ. कागदपत्रांवरुन शाळा व निवासी पत्याच्या अंतराची पडताळणी करावी. निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देवू नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समिती , शिक्षणाधिकारी यांचेकडे अर्ज करण्यास सांगावे. पडताळणी समितीने त्यांच्याकडे आलेले अर्ज व तक्रारीची शहानिशा करुन प्रतिक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरु होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देवू नये याबाबतचा आदेश शाळेला द्यावा. त्या आदेशाप्रमाणे शाळेने कार्यवाही करावी. शुक्रवार दिनांक 11 जून पासून शाळांनी पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर दिनांक द्याव्यात. आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश सुरु झाले आहेत अशा सूचना शाळेच्या प्रवेशद्वारावर लावाव्यात.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येवू शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे, कीट्सअॅपद्वारे शाळेत संपर्क करुन प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. सविस्तर सूचना आरटोई पोर्टल वर दिल्या जातील, असे शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी कळविले आहे.