नवी दिल्ली
दि. ७ ऑगस्ट २०२५
क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे चर्चेत असलेला ऋषभ पंत आता समाजसेवेच्या भूमिकेतही हिरो ठरतो आहे. इंग्लंडमधील दमदार पुनरागमनानंतर पंतने एक असा ‘स्ट्रोक’ खेळला आहे, ज्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणले. कर्नाटकमधील गरीब घरातील हुशार मुलगी – ज्योती कणाबूर मठ – हिला उच्च शिक्षणासाठी मदतीची गरज होती आणि ऋषभ पंत तिच्यासाठी देवदूत ठरला.
हुशारी होती, पण पैशांचा अडसर…
बागलकोट जिल्ह्यातील बिलगी तालुक्यातील रबकवी गावची ज्योती, १२ वी मध्ये ८३ टक्के गुण मिळवून BCA (Bachelor of Computer Applications) करण्यासाठी उत्सुक होती. पण घरची आर्थिक परिस्थिती खालावलेली. वडील चहाची टपरी चालवणारे तीर्थय्या, जे आता पुढील शिक्षणाचा खर्च उचलू शकत नव्हते.
४० हजारांची गरज… आणि ऋषभ पंतची मदत
ज्योतीच्या BCA प्रवेशासाठी ४०,००० रुपयांची गरज होती. वडीलांनी गावातील स्थानिक ठेकेदार अनिल हुनशिकट्टी यांच्याकडे मदतीची विनंती केली. अनिल यांनी ही गोष्ट आपल्या बंगळुरूतील मित्रांपर्यंत पोहोचवली आणि तिथून थेट ऋषभ पंतपर्यंत ही माहिती पोहोचली.
संपूर्ण माहिती मिळताच, ऋषभ पंतने कोणतीही जाहिरात न करता थेट कॉलेजच्या बँक खात्यात ४०,००० रुपये ट्रान्सफर करून फी भरली आणि ज्योतीचं स्वप्न साकार होण्यासाठी मदतीचा हात दिला.
‘सावित्रीची लेक’ म्हणाली – ऋषभ दादा, मी आयुष्यभर ऋणी…
एका व्हिडीओमध्ये ज्योती म्हणते,
“BCA करणं हे माझं स्वप्न होतं. पण आर्थिक अडचणींमुळे ते अपूर्ण राहणार, असं वाटत होतं. अशा वेळी ऋषभ पंत दादांनी मदतीचा हात दिला. मी त्यांच्या उपकारांची आयुष्यभर ऋणी राहीन.”
क्रिकेटपटूचा माणूसपणाचा ‘शॉट’
मैदानावर चौकार-षटकार ठोकणारा ऋषभ पंत मैदानाबाहेरही समाजासाठी किती सजग आहे, हे पुन्हा एकदा दिसून आलं. केवळ खेळ नव्हे, तर मन जिंकणं हाच खरा विजय असतो, हे पंतने कृतीतून दाखवून दिलं आहे.