सोलापूर प्रतिनिधी
०८ ऑगस्ट २०२५
सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते शरणू हांडे यांच्या अपहरणाने एकच खळबळ उडाली आहे. धारधार शस्त्रांच्या धाकाने सात जणांनी त्यांच्या पायांना दोराने बांधून, गाडीत जबरदस्तीने कोंबले. ही घटना अक्षरशः एखाद्या थरारपटात शोभेल अशी असून, शहरभरात याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शरणू हांडे यांची सुटका केली असून, मुख्य आरोपी अमित सुरवसे व त्याचे सहा साथीदार अटकेत आहेत. प्राथमिक चौकशीतून हे अपहरण जुन्या राजकीय रंजिशीतून झाल्याचे उघड झाले आहे.
नेमकं घडलं काय?
२०१७ मध्ये आमदार पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेक प्रकरणात आरोपी असलेल्या अमित सुरवसेला काही दिवसांपूर्वी शरणू हांडे यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी सुरवसेने अपहरणाचा कट रचला आणि सहकाऱ्यांच्या मदतीने हांडे यांना जबरदस्तीने उचलून नेले.
शरणू हांडे यांनी सांगितलेला थरार
सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरणू हांडे यांनी माध्यमांशी बोलताना घटनेचा सविस्तर तपशील दिला. “मी पानटपरीजवळ उभा होतो. अचानक एक गाडी थांबली. काही लोक उतरले आणि त्यांनी मला मारहाण सुरू केली. त्यांनी मला गाडीत कोंबले. पाय बांधून, शस्त्रांच्या धाकाने ते मला कुठेतरी घेऊन जात होते. सातजण होते. त्यांच्या हातात कोयते, हॉकी स्टिक आणि तलवारी होत्या. गाडीतही ते मला सतत मारत होते,” अशी थरारक माहिती त्यांनी दिली.
पोलिसांची वेगवान कारवाई
घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली आणि कर्नाटकच्या सीमेसह मुख्य मार्गांवर नाकाबंदी लावली. रात्रीच्या सुमारास होर्टी गावाजवळ पोलिसांनी संशयित आरोपींना पकडले. गाडीत शरणू हांडे गंभीर अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले.
गुन्हा दाखल, चौकशी सुरू
या संपूर्ण प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक केलेल्या सातही आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
ही घटना केवळ राजकीय नव्हे तर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही गंभीर मानली जात असून, सोलापुरात सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.