नवी दिल्ली प्रतिनिधी
दि. ०८ ऑगस्ट २०२५
पुण्यातील खराडी परिसरात नुकतीच उघडकीस आलेली रेव्ह पार्टी आता अधिकच चर्चेत आली आहे. या प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. खेवलकरांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत असताना, आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी थेट प्रवेश करत गंभीर आरोप केले आहेत.
मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर?
पत्रकार परिषद घेत रूपाली चाकणकर यांनी दावा केला की, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ आणि फोटो सापडले आहेत. त्यांनी या मुद्द्यावरून तपास यंत्रणांना अधिक कठोर कारवाई करण्याचे आवाहनही केले. त्यामुळे प्रकरणात आणखी एक वळण आले आहे.
सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका
या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
“रोहिणी खडसे आमच्या पक्षात आहेत, पण त्यांच्या पतीचा पक्षाशी काही संबंध नाही. मी वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही. हे माझं राजकारण नाही आणि मी कधीही पातळी सोडून राजकारण केलेलं नाही,” असं सुळे म्हणाल्या.
तसंच, राईट टू प्रायव्हसी (Right to Privacy) या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि संसदेनं मान्य केलेल्या कायद्याचा हवाला देत त्यांनी सांगितलं की,
“कोणाचाही मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला तर तो केवळ न्यायालयाला दाखवता येतो, सार्वजनिकरीत्या त्यातील माहिती उघड करणे हा गुन्हा आहे. मी कोणालाही डिफेंड करत नाही, पण कायद्याच्या चौकटीतच सर्व काही व्हायला हवं.”
“कुटुंबीयांची जबाबदारी वैयक्तिक आहे”
सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या कुटुंबाचा दाखला देत स्पष्ट केलं की, “सदानंद सुळे जर सरकारमध्ये काही गैरप्रकार करत असतील, तर त्याची जबाबदारी मी घेईन. पण एखाद्या व्यक्तीचे कुटुंबीय दैनंदिन आयुष्यात काय करतात, याचं उत्तर देणं माझं किंवा पक्षाचं काम नाही.”
त्यांनी अधिक स्पष्ट करत म्हटलं, “आम्ही प्रोफेशनल राजकारण करतो. कोणाच्या कुटुंबात जाऊन बोलणं आम्ही करत नाही.”
फडणवीसांवरही अप्रत्यक्ष टोला
या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत, सुप्रिया सुळे म्हणाल्या की,
“देवेंद्रजी हे राज्याचे सक्षम वकील आहेत. त्यांना याबाबत माझ्यापेक्षा अधिक माहिती आहे. काय करायचं, ती जबाबदारी आता सरकारची आहे.”
एकूणच काय?
रेव्ह पार्टी प्रकरण आता राजकीय वर्तुळातही चांगलंच तापलं आहे. रूपाली चाकणकरांचे आरोप आणि सुप्रिया सुळे यांची कायद्याच्या चौकटीतली प्रतिक्रिया या वादाला वेगळं परिमाण देत आहेत. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची पुढील दिशा कोणती घेतली जाते, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.