सोलापूर प्रतिनिधी
दि. ०८ ऑगस्ट २०२५
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याच्या अपहरणप्रकरणी मोठा गौप्यस्फोट झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच्या एका जुन्या वादातून रोष धरून हे अपहरण करण्यात आलं, अशी माहिती समोर येत असतानाच आता या प्रकरणात थेट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं नाव समोर आलं आहे. शरणू हांडे या अपहरित कार्यकर्त्याने गंभीर आरोप करत सांगितलं की, “रोहित पवार व्हिडिओ कॉलवर होते. त्यांनी मला अमित सुरवसेची माफी मागायला सांगितली. मी नकार दिल्यावर त्यांनी ‘याला पाहून घ्या’ असं म्हणत फोन कट केला.”
काल रात्री १० वाजता सोलापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या काही साथीदारांना अटक केली. शरणू हांडे यांना गंभीर मारहाण करण्यात आली असून, त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी आज रुग्णालयात जाऊन शरणू हांडे यांची भेट घेतली. यावेळी हांडेंनी संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट केला. ते म्हणाले, “माझं अपहरण केल्यानंतर साधारण १०-१५ मिनिटांत रोहित पवारांचा व्हिडिओ कॉल आला. त्यांनी मला झालेली जखम बघितली आणि सुरवसेची माफी मागायला सांगितली. मी नकार दिल्यावर, ‘त्याला फार मस्ती आहे, पाहून घ्या’ असं म्हणत त्यांनी फोन कट केला.”
हांडे पुढे म्हणाले, “अपहरण करणाऱ्यांपैकी तिघं जण सतत म्हणत होते की ‘मारायचं नाही’. त्यांचे उच्चार आणि बोलण्याची शैली ऐकून वाटलं की ते पुण्याचे असावेत. ते तिघे निंबाळ स्टेशनवर उतरले. मात्र बाकीचे मला मारायला उद्युक्त करत होते. बाहेर गाडी थांबवून चर्चा करत होते. सुदैवाने पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्यामुळे माझा जीव वाचला.”
पोलिसांनी या प्रकरणात वेगाने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. तपास सुरू असून, राजकीय वादातून प्रेरित हा हल्ला होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत.
या घटनेमुळे सोलापूरसह राज्यात राजकीय खळबळ उडाली असून, रोहित पवार यांच्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे या प्रकरणाचा पाठपुरावा कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.