नवी दिल्ली प्रतिनिधी
दि. ०८ ऑगस्ट २०२५
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता दिल्ली दरबारी त्यांच्या पुनरागमनासाठी हालचाली सुरू झाल्याचं समजतंय. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मुंडेंना मंत्रिपद परत मिळवून देण्यासाठी लॉबिंग सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा थेट सहभाग नसल्याचं अधोरेखित करत काही वरिष्ठ नेते त्यांच्यासाठी “क्लिन चिट” मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानेही ही माहिती दिली असून, योग्य वेळी मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावं, असा सूर या लॉबिंगमागे आहे.
यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कृषी खात्यातील खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना निर्दोष घोषित करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांच्या पुनरागमनाची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काही दिवसांपूर्वी सूचक वक्तव्य करत संकेत दिले होते.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोणत्याही वरून आलेल्या दबावामुळे नव्हता, हेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, असं पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं. यामुळेच आता प्रकरण शांत झाल्यावर त्यांच्या पुनरागमनाचा रस्ता मोकळा केला जातोय, अशी चर्चा आहे.
तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या सगळ्यावर काय मत असेल, हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अलीकडच्या काळात महायुती सरकारातील काही मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा डागाळली होती. याच पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटेंची उचलबांगडी झाली होती, तर शिवसेनेतीलही काही मंत्र्यांची प्रकरणं चर्चेत आली होती.
धनंजय मुंडेंनी आरोग्य कारणास्तव पद सोडलं होतं, असं जाहीर करण्यात आलं होतं. पण आता त्यांच्या पुनरागमनासाठी पक्षाकडून सज्जता दाखवली जात आहे. मात्र, हा मार्ग त्यांच्या राजकीय पुनरागमनासाठी सुकर ठरेल की अडथळ्यांनी भरलेला, हे येत्या काळात स्पष्ट होईल.