मुंबई प्रतिनिधी
दि. ०८ ऑगस्ट २०२५
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडामधील ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा एकदा गोळीबार झाला असून, गेल्या महिन्याभरात ही दुसरी घटना आहे. या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीच्या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लाडी याने घेतली होती. आता दुसऱ्या हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीचं नाव पुढे आलं आहे.
या हल्ल्यामागचं कारण कपिल शर्माचे सलमान खान यांच्यासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा दावा केला जात आहे. बिश्नोई टोळीने कपिलला इशारा दिला आहे की, “जो सलमानसोबत काम करेल, तो संपेल.” हाच संदेश एका ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतो आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हॅरी बॉक्सर नावाच्या बिश्नोई टोळीच्या गुंडाने या क्लिपमध्ये कपिलला थेट धमकी दिली आहे. तो म्हणतो, “पुन्हा पुन्हा सांगणार नाही… जो सलमानसोबत काम करेल, त्याच्यावर गोळी झाडली जाईल.” या धमकीनंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
कपिल शर्माने आपल्या शोच्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या भागात सलमान खानला निमंत्रित केलं होतं, यामुळे बिश्नोई टोळी चिडली होती, असा संशय व्यक्त केला जातो.
दरम्यान, कपिल शर्माच्या सुरक्षेचा आढावा घेत त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.
सलमान-बिश्नोई वैराची पार्श्वभूमी
सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वैर नवीन नाही. काळवीट शिकार प्रकरणापासून बिश्नोई टोळी सलमानवर टिका करत आली आहे. या प्रकरणातूनच सलमान खानवर अनेकदा हल्ल्याचे प्रयत्न झाले होते. याचमुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती.
हल्ल्यांमागचं सत्य काय आणि कपिल-सलमान यांना पुढे अजून काय धोका आहे, हे तपासणं आता पोलीस यंत्रणेपुढचं मोठं आव्हान ठरत आहे.