बीड प्रतिनिधी :
दि. ०८ ऑगस्ट २०२५
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, वडवणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित जाहीर मेळाव्यात त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींवर थेट हल्लाबोल केला. भाजपचे राजाभाऊ मुंडे व बाबरी मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं – “आता कुणाचे लाड केले जाणार नाहीत. ना कोणी आका, ना कोणी फाका – गुन्हेगारीला माफी नाही!”
गुन्हेगारीला थारा नाही – अजित पवारांचा इशारा
पवार म्हणाले, “सर्व नागरिक माझ्यासाठी समान आहेत. कोणी मोठ्या बापाचा आहे म्हणून सवलत नाही. एकदा समजवा, दुसऱ्यांदा समजवा… पण तिसऱ्यांदा चुकला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा. पुन्हा जर गुन्हा केला, तर थेट मकोका लावा आणि जेलमध्ये पाठवा.”
त्यांनी प्रशासनालाही स्पष्ट संदेश दिला की, “गुन्हेगार ओळखीचा असो वा नसो, कायद्याचे पालन व्हायलाच हवे. चुकीला माफी नाही. चांगल्या कामासाठी मी रात्रीच्या बारा वाजताही तुमच्या पाठीशी उभा राहीन, पण गुन्हेगारीला थारा नाही.”
विकासाच्या दिशेने पावलं
अजित पवार यांनी बीडच्या विकासावरही भर दिला. “मी वयाच्या ३०व्या वर्षी आमदार झालो. पवार साहेबांनी आम्हाला लवकर जबाबदाऱ्या दिल्या, त्यामुळे राज्याच्या गरजा समजून घेतल्या. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास माझ्या अजेंड्यावर आहे,” असं ते म्हणाले.
महिलांसाठी नवीन योजना, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज
पवार यांनी महिलांसाठी येणाऱ्या भाऊबीजेला नव्या योजना जाहीर करण्याचा इशारा दिला. “माझा शेतकरी राजा म्हणतो, तुमची बहीण लाडकी, मग आम्ही काय दोडके आहोत का? म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना वीजही मोफत देणार आहोत,” असा दिलखुलास संवादही त्यांनी साधला.
नव्या कार्यकर्त्यांना संधी, निवडणुकीसाठी सज्जता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना जागं केलं. “मी नेहमी नवीन कार्यकर्त्यांना संधी देतो. सकाळी लवकर उठून जनतेसाठी काम करत असतो. कारण हा पैसा जनतेचा आहे, तो वाया जाऊ नये, हे माझं कर्तव्य आहे,” असंही ते म्हणाले.
“मागेल त्याला घर” या योजनेचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांना चांगली घरे बांधून उत्तम जीवन जगण्याचे आवाहन केलं.
या दौऱ्यात अजित पवार यांनी आपल्या रोखठोक शैलीत गुन्हेगारी प्रवृत्तींना इशारा देत, विकासाचे आणि सामाजिक न्यायाचे वचन दिले आहे. त्यांच्या वक्तव्यानं बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे, हे नक्की.