मुंबई प्रतिनिधी
दि. ०८ ऑगस्ट २०२५
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर जोरदार टीका करत “१ कोटी बोगस मतदारांची भर घालण्यात आली” असा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांच्या या गंभीर वक्तव्यावर आता राज्य निवडणूक आयोगाने थेट पत्र पाठवत उत्तर दिलं आहे आणि शपथपत्र सादर करण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधींचा आरोप काय?
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की,
“महाराष्ट्रात अवघ्या सहा महिन्यांत १ कोटी बनावट मतदार कसे तयार झाले? हे स्पष्ट पद्धतीने मतदान चोरीचं रचलेलं जाळं आहे!”
त्यांनी बोगस मतदारांची यादी बनवण्यासाठी पाच प्रकारच्या त्रुटी दाखवत यामध्ये –
फेक मतदार,
चुकीचे पत्ते,
एकाच पत्त्यावर अनेक मतदार,
चुकीचे फोटो,
आणि फॉर्म ६ चं उल्लंघन
…या गोष्टींचा उल्लेख केला. राहुल गांधींनी कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघाचं उदाहरण देत निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अपारदर्शकता असल्याचा दावा केला.
निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर – काय म्हटलं आहे पत्रात?
राज्य निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांवर तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. पत्रात आयोगाने म्हटलं आहे की,
“काँग्रेसच्या प्रतिनिधींना दोन वेळा अद्ययावत मतदार यादी दिली होती. तरीही जर बोगस मतदार असल्याचा आरोप केला जात असेल, तर राहुल गांधी यांनी शपथपत्र सादर करावं आणि स्पष्ट पुरावे सादर करावेत.”
आयोगाने आणखी स्पष्ट केलं की,
खोटं शपथपत्र देणं हे IPC कलम ३१ नुसार गुन्हा आहे.
खोटे पुरावे सादर करणं IPC कलम २२७ अंतर्गत गुन्हा आहे.
तसेच, “राहुल गांधी स्वतः त्या संबंधित मतदारसंघाचे मतदार आहेत का?” हे देखील नमूद करण्यास सांगण्यात आलं आहे.
पुढे काय?
राहुल गांधींच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे काँग्रेस पक्षाला आता थेट पुरावे सादर करण्याचं आव्हान मिळालं आहे. या प्रकरणात पुढे कायदेशीर कारवाई होते का? आणि नवीन खुलासे समोर येतात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.