मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ ऑगस्ट २०२५
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि उद्योजक शंभूराज खुटवड यांचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला. खरं तर या दोघांच हे लग्न लव्ह कम अरेंज असणार आहे. कारण एका अपघातामुळे दोघांची पहिली भेट झाली आणि शंभूराज पहिल्याच भेटीत प्राजक्ताच्या प्रेमात पडले. एका चित्रपटाच्या नाईट शिफ्टच्या शूटिंगला जात असताना प्राजक्ताच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. तेव्हा गाडीचे बरेच नुकसान झाल्याने प्राजक्ता त्या ड्रायव्हरवर चांगलीच संतापली. त्यावेळी ड्रायव्हर नशेत असल्याने तो अर्वाच्य भाषेत प्राजक्ताशी बोलू लागला. तेव्हा तिने ट्रक ड्रायव्हरला मालकांना बोलवायला संगितले. या सगळ्यामुळे ती प्रचंड चिडली होती. तिला माहिती नव्हतं की हेच (शंभुराज खुटवड) मालक आहेत. हे आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला दोन कानशिलात दिल्या, कारण तो दारू प्यायला होता. प्राजक्ता काय बोलते आहे ते देखील या ड्रायव्हरला कळत नव्हतं. गाडीचं नुकसान झाल्याने शूटिंगला जाता येणार नाही या काळजीत असतानाच शंभूराज यांनी स्वतः त्यांच्या गाडीने प्राजक्ताला शूटिंगच्या ठिकाणी नेऊन सोडले. इथेच दोघांची मैत्री झाली.
पुढे अनेक भेटीत प्राजक्ता शंभूराज यांना दादा म्हणूनच हाक मारत असे. तर शंभूराज प्राजक्ताच्या प्रेमात असल्याने कायम मॅडम म्हणून हाक मारत. सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट केल्यानंतर वयाने छोट्या मोठ्या व्यक्ती प्राजक्ताला ताई म्हणत पण शंभूराज यांनी ताई असं कधीच म्हटलं नाही. त्यानंतर शंभूराज यांनी प्राजक्ताला लग्नाची मागणी घातली, पण त्यावेळी प्राजक्ताने नकार दिला कारण खुटवड कुटुंब ही जॉईंट फॅमिली होती, तर प्राजक्ताचं छोटंसं कुटुंब, त्यामुळे आपलं या मोठ्या कुटुंबात कसं होणार? असा प्रश्न तिला पडला. पण पुढे तिचं मत परिवर्तन झालं.
शिवाय एक अभिनेत्री म्हणून हे क्षेत्र वेगळं असतं. इथे नातं टिकवण्यासाठी एकमेकांवर विश्वास असावा लागतो, तेव्हा शंभूराज प्राजक्तासोबत शूटिंगच्या ठिकाणी जाऊ लागले आणि त्यांनी त्या क्षेत्राची ओळख करून घेतली. दरम्यान दोघांमध्ये प्रेमाचे सूर जुळत गेले. पुढे प्राजक्ताच्या घरी तिच्या लग्नासाठी विचार सुरू झाले. तेव्हा घरच्यांच्या संमतीशीवाय मी लग्न करणार नाही असे म्हटल्यानंतर शंभूराज यांनी रीतसर लग्नाची मागणी घातली आणि काही दिवसातच त्यांनी साखरपुडाही केला.