पंढरपूर प्रतिनिधी :
दि. ११ ऑगस्ट २०२५
राज्यातील मराठी–हिंदी वादाचा सूर आता पंढरपूरच्या श्री विठ्ठल–रूक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचला आहे. मंदिरात एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला आहे. राहुल सातपुते यांनी एक्सवर पोस्ट करत, “महाराष्ट्राच्या आद्य दैवताच्या दरबारात हिंदी सक्ती होतेय का?” असा सवाल उपस्थित केला.
यावर मंदिर समितीने स्पष्ट केले की, श्रींच्या सर्व पूजा मराठी व संस्कृत भाषेतच पार पडतात. पूजेसाठी देशभरातून ऑनलाइन बुकींग प्रणाली सुरू आहे. भाविकांना पूजेची माहिती आणि आवश्यक सूचना समजावून सांगण्यासाठी प्राधान्याने मराठी आणि कधी आवश्यकता असल्यास हिंदी भाषेचाही वापर होतो, मात्र मंत्र पठण फक्त मराठी व संस्कृतमध्येच केले जाते.
तुळशीपूजा प्रक्रियेबाबत समितीने सांगितले की, संत तुकाराम भवन येथे आचमन, संकल्प, गणपती स्मरण, श्री विठ्ठल–रूक्मिणी स्मरण आणि विष्णुसहस्त्रनाम पठणानंतरच पूजा पूर्ण होते. या सर्व टप्प्यांत मराठी व संस्कृत भाषेचा वापरच होतो.
सातपुते यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या गेल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.