नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ११ ऑगस्ट २०२५
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मत चोरी’च्या मुद्द्यावर आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप करून त्यांनी निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. आयोगाने त्यांना आपल्या आरोपांसाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास किंवा खोटे आरोप केल्याबद्दल सार्वजनिक माफी मागण्यास सांगितले आहे.
दरम्यान, काँग्रेसने votechori.in/ecdemand ही वेबसाईट सुरू केली असून, त्यावर नागरिकांना ‘मत चोरी’विरोधात निवडणूक आयोगाकडे जाब विचारण्यासाठी आणि डिजिटल मतदार यादीसाठी समर्थन नोंदवता येणार आहे. तसेच ९६५०००३४२० या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊनही मोहिमेत सहभागी होता येईल.
राहुल गांधींनी एक्सवर लिहिले, “मत चोरी म्हणजे लोकशाहीच्या ‘एक व्यक्ती, एक मत’ या मूलभूत तत्त्वावर हल्ला आहे. पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करणे आवश्यक आहे.” वेबसाइटवर प्रकाशित व्हिडिओत त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर संगनमत करून “मोठी गुन्हेगारी फसवणूक” केल्याचा आरोप केला आहे.
कर्नाटकातील बंगळूरू सेंट्रल मतदारसंघातील एका विधानसभा क्षेत्रात तब्बल एक लाखाहून अधिक बनावट मतदार आढळल्याचा दावा राहुल गांधींनी केला. “असेच प्रकार ७०-१०० मतदारसंघांत घडले तर निवडणुका स्वतंत्र राहणार नाहीत,” असा त्यांचा इशारा आहे.
वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर सहभागींना ‘मी मत चोरीच्या विरोधात आहे’ असे लिहिलेलं डिजिटल प्रमाणपत्र दिलं जातं. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि कोषाध्यक्ष अजय माकन यांच्या सही असते. हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करण्याचाही पर्याय आहे.
काँग्रेसने महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील मतदार यादीतील गडबडींवर याआधीच चिंता व्यक्त केली होती. आता पक्षाने पुरावे असल्याचा दावा करत, “लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार” असा निर्धार व्यक्त केला आहे.