मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ ऑगस्ट २०२५
भोपाळचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अभिनीत गुप्ता हे ‘बिग बॉस’ या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश मिळवण्याच्या आश्वासनावरून १० लाखांच्या फसवणुकीचे बळी ठरले.
गुप्ता यांनी सांगितले की, २०२२ मध्ये भोपाळमध्ये झालेल्या ऑडिशनदरम्यान त्यांची करण सिंग प्रिन्स याच्याशी ओळख झाली. करण सिंगने स्वतःचे ‘बिग बॉस’शी चांगले संबंध असल्याचे सांगत, बॅकडोअर एन्ट्री मिळवून देण्याचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला १ कोटी रुपये मागण्यात आले, मात्र रक्कम कमी करून ६० लाख व काही रोख देण्याची अट घालण्यात आली.
मुंबईत नेऊन करण सिंगने गुप्ताची एंडेमोल कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हरीश शाह यांच्याशी भेट घडवून आणली. तसेच सोनू कुंतल व प्रियांका बॅनर्जीही या भेटीत उपस्थित होते. विश्वास बसल्याने गुप्ता यांनी १० लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून ट्रान्सफर केले. मात्र, ‘बिग बॉस’ सीझन १६ च्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यानंतर करण सिंगने वाइल्ड कार्ड किंवा पुढील सीझनमध्ये संधी देण्याचे आश्वासन दिले, परंतु तसे काही घडले नाही.
सीझन १७ संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. तब्बल दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी मुंबईत करण सिंग प्रिन्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. डॉ. गुप्ता यांनी लोकांना इशारा देत सांगितले, “लोभाला बळी पडू नका, अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा.”