मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ ऑगस्ट २०२५
अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता ललित प्रभाकर यांच्या पहिल्यावहिल्या जोडीचा ‘आरपार’ हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. ‘प्रेमात अधलं-मधलं काही नसतं’ या संदेशासह प्रदर्शित झालेल्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. रोमँस, ड्रामा आणि भावनिक वळणांनी भरलेल्या या कथेत दोघांचा नव्या लूकमधील अंदाज प्रेक्षकांना भावतो आहे.
टीझरमध्ये ललित–ऋताची गोड केमिस्ट्री, त्यातला गैरसमज, वाद आणि दुरावा हे सगळं एकत्र पाहायला मिळतं. टॅगलाईन आहे – “प्रेमात वेड लावायची ताकद असते, फक्त पार्टनर चांगला मिळायला हवा.” त्यामुळे चित्रपटाचा शेवट कसा असेल याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
या सिनेमाची आणखी एक खासियत म्हणजे तो १२ सप्टेंबरला, म्हणजेच ऋता आणि ललित या दोघांच्या वाढदिवशीच, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या जोडीसाठी हा दिवस दुप्पट खास ठरणार आहे.
‘आरपार’ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन यांची जबाबदारी गौरव पत्की यांनी सांभाळली असून, टीझर पाहून अनेक चाहत्यांनी हा सिनेमा ‘सैयारा’पेक्षाही अधिक भावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.