कोल्हापूर प्रतिनिधी :
दि. १९ ऑगस्ट २०२५
संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही राष्ट्रीय महामार्ग व घाटमार्ग बंद करण्यात आले असून अनेक एसटी सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर बनत असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
वाहतुकीसाठी मुख्य रस्ते बंद
कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने मार्ग बंद असून या मार्गावरील एसटी सेवा थांबवण्यात आली आहे. तसेच, अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग सकाळी काही वेळ बंद ठेवावा लागला होता. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हस्तक्षेप करत दुपारपर्यंत मार्ग मोकळा केला आहे.
नद्या धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ
पंचगंगा नदी राजाराम बंधाऱ्याजवळ ३५.४ फूटांवर वाहत आहे. ही पातळी ३९ फूटांच्या इशारा पातळीच्या अगदी जवळ आहे. जिल्ह्यातील ७३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे काही मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली जात आहे.
प्रमुख मार्ग व बंधारे पाण्याखाली
सांगरूळ-कळे मार्गासह, वारणा, तुळशी, धामणी व वेदगंगा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. महे/बीड धरणावर पाण्याचा जोर वाढल्याने त्या भागातील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग
राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडले गेले असून, ११,५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. काळम्मावाडी धरणातूनही ७,६०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य धरणांतूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.
एसटी बस सेवा झाली ठप्प
पावसामुळे जिल्ह्यातील अनेक एसटी मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत:
कोल्हापूर-गगनबावडा – सेवा बंद
वाळवा-बाचणी – बंद; गिरगाव मार्गे पर्यायी वाहतूक
गडहिंग्लज-ऐनापूर – बंद; महागाव मार्गे पर्यायी सेवा
उखळू-शितळ, चंदगड-भोगोली, पडळी-पिरळ, आजरा-देवकांडगाव आदी मार्गांवरही वाहतूक बंद असून पर्यायी मार्गांचा वापर सुरू आहे.
प्रशासन सतर्क, नागरिकांना सतर्क राहाण्याचे आवाहन
जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि अग्निशमन दल हे सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना अत्यावश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित राहाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.