मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि.०८ जुन २०२१
पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव या शिष्टमंडळाने फडणवीस यांना दिले आहेत.
कोविडच्या नियमांचे पालन करतानाच हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत सुद्धा खंड पडू नये, असा व्यवहार्य प्रस्ताव वारकरी शिष्टमंडळाने दिला आहे. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, “मी स्वत: लक्ष घालून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन. हा अतिशय चांगला पर्याय आहे. वर्षानुवर्ष चालत आलेल्या वारीत कोणताही खंड पडायला नको.”
या प्रसंगी विठ्ठल रूख्मिणी मंदिरे समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बातमी नक्की शेअर करा