मुंबई प्रतिनिधी
दि. २० ऑगस्ट २०२५
राज्यात गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मुंबई आणि तिच्या उपनगरांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या जोरदार पावसामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून अनेक नागरिक रस्त्यावर अडकले आहेत. घरात पाणी शिरलेल्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.
अशा कठीण प्रसंगी, समाजातील काही संवेदनशील व्यक्ती मदतीसाठी पुढे सरसावतात. अशांपैकीच एक उदाहरण म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या पत्नी मिताली जोशी यांनी दाखवलेली उदारता. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
“मी चांदीवली येथे राहते. आमच्याकडे दूध, चहा, कॉफी आणि अल्पोपाहाराची सोय आहे. मला माणसांना खाऊ पिऊ घालायला आवडते. जर तुम्ही इथे आसपास कुठे पावसाच्या पाण्यामुळे अडकला असाल तर मला सांगा,” असे मिताली यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांचे खुले दिलाने स्वागत केले आहे. सोशल मीडियावरही त्यांचे कौतुक होते आहे.
दरम्यान, पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. वाहतूक यंत्रणा ठप्प असून, टॅक्सी सेवा आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीही वाढल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी मितालीसारख्या व्यक्तींनी उचललेले पाऊल गरजूंना दिलासा देणारे आहे.
संकटाच्या काळात माणुसकी जपणाऱ्या या मदतीच्या हातांना सलाम!