मुंबई प्रतिनिधी
दि. २० ऑगस्ट २०२५
मुंबईने पुन्हा एकदा पावसापुढे हात टेकले. मंगळवारी मुसळधार पावसासोबत भरतीचा फटका बसल्यामुळे, शहरातील रस्ते, घरं, दुकानं जलमय झाली. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कुर्ला परिसरात तर हाहाकार उडाला.
एकीकडे झाडं कोसळली, तर दुसरीकडे पाण्यात अडकलेल्या बसगाड्या बंद पडल्या. रस्ते जलमय झाल्यामुळे शेकडो वाहनं अडकून पडली. मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत आपली कामं गाठावी लागली.
विनाशकारी दृश्य – कुर्ल्यात ६ फूट पाणी!
मिठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर परिसरात पाणी शिरलं. इतकंच नव्हे तर काही भागात ६ फूट उंच पाणी साचलं.
परिणामी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ला तातडीने पाचारण करण्यात आलं. त्यांनी ४०० पेक्षा अधिक कुटुंबांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी केलं.
या भागातील पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे नागरिक अजूनही धोकादायक घरांमध्ये राहत होते. त्यामुळेच पावसाने त्यांच्या जगण्यालाच प्रश्नचिन्ह लावलं.
‘सतत धावणारी’ मुंबई ठप्प
शहरातील ५० ठिकाणी झाडे कोसळली
BEST बसगाड्या बंद पडल्या
अनेक घरांत व दुकानांत पाणी शिरलं
लोकलसेवा विस्कळीत, फक्त मेट्रोने दिला दिलासा
‘कधीही न थांबणारी’ म्हणवली जाणारी मुंबई, मंगळवारी अक्षरशः ठप्प झाली. नागरिकांनी मेट्रो सेवा गाठण्याचा प्रयत्न केला, पण सर्वच दळणवळण प्रणाली कोलमडल्याने मुंबईकरांचे हाल झाले.
भूस्खलनाचा धोका – रहिवाशांचं स्थलांतर
विक्रोळी सूर्यानगर आणि भांडुप खिंडीपाडा येथील संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणाहून नागरिकांना हलवण्यात आलं.
भांडुपमधील महाराष्ट्र नगर आणि कोवळे कंपाउंड येथे संरक्षण भिंत कोसळल्यामुळे चार कुटुंबांना तातडीने स्थलांतरित करण्यात आलं.
मुंबईबरोबरच राज्यभरात धुमाकूळ
मुंबईपुरताच हा पावसाचा कहर मर्यादित नाही. ठाणे, नवी मुंबई, पालघर, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्येही पावसाने थैमान घातलं आहे.
नियोजन अपयशी, जनजीवन विस्कळीत
महापालिकेच्या नालेसफाई, पावसाळी नियोजनाच्या फोलपणाचा मुंबईकरांना पुन्हा एकदा फटका बसला आहे.
नद्या ओसंडून वाहत आहेत, घरं जलमय झाली आहेत, आणि नागरिकांचे जीवन संकटात सापडले आहे.