मुंबई प्रतिनिधी
२० ऑगस्ट २०२५
सणासुदीच्या खरेदीला सुरुवात होत असतानाच सोन्याच्या दरात घसरण झाली असून, ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालाय. गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दरात आज १०० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.
MCX वायदे बाजारात ऑक्टोबर कॉन्ट्रॅक्टसाठी सोन्याचा दर ९८,६३० रुपये इतका नोंदवला गेला आहे. याशिवाय, बाजारात १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ९१,८०० रुपये, तर २४ कॅरेटसाठी १,००,१५० रुपये इतकी आहे.
सराफा बाजारात ५०० रुपयांची घसरण
सराफा बाजारात सोन्याच्या भावात ५०० रुपयांची घट झाली आहे. यामुळे सणासुदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सराफा दुकानांकडे वळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करतात. त्यामुळे किंमतीतील ही घसरण खरेदीस प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.
चांदीही झाली स्वस्त
फक्त सोन्याच नव्हे तर चांदीच्या किंमतीतही १०० रुपयांची घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर १,१५,००० रुपये इतका आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांनाही थोडासा दिलासा मिळालाय.
अजूनही दर ‘आवाक्याबाहेर’
सोनं स्वस्त झालं असलं तरीही एकूण किंमती अजूनही सामान्य ग्राहकांच्या आवाक्याच्या बाहेरच आहेत. लाखाच्या आसपास पोहोचलेल्या २४ कॅरेट सोन्याच्या दरामुळे बहुतांश ग्राहक अजूनही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमती कमी होणं म्हणजे खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आहे. पण वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हे दर किती काळ टिकतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.