डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २० ऑगस्ट २०२५
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होताच, आयसीसीने मंगळवारी वनडे बॅट्समन रँकिंग जाहीर केली. मात्र या नव्या रँकिंगमध्ये टीम इंडियाचे दोन प्रमुख चेहरे – कर्णधार रोहित शर्मा आणि वरिष्ठ फलंदाज विराट कोहली – यांचा कुठेही उल्लेख नसल्यानं क्रिकेटप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे.
टॉप ५ मधून थेट गायब!
गेल्या आठवड्यातच रोहित आणि विराट अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर होते. रोहितकडे ७५६ गुण होते, तर विराटकडे ७३६. पण केवळ एका आठवड्यात या दोघांची नावं संपूर्ण यादीतूनच गायब झाल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं? नियम की चूक?
आयसीसीच्या नियमानुसार, जर एखादा खेळाडू ९ ते १२ महिने एकदिवसीय सामने खेळलेला नसेल किंवा निवृत्त झाला असेल, तर त्याला रँकिंग यादीतून बाहेर काढलं जातं. पण रोहित आणि विराट हे दोघेही मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळले होते — ज्याला फक्त पाच महिनेच झाले आहेत. तसेच, त्यांनी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केलेली नाही.
तांत्रिक गडबडीची शक्यता
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ही बाब नियमांमुळे नाही, तर तांत्रिक चुकांमुळे घडली असावी. त्यामुळे आयसीसी लवकरच सुधारित रँकिंग जाहीर करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय संघाच्या दोन मोठ्या नावांना रँकिंग यादीतून बाहेर केल्यामुळे क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे. चाहत्यांना आणि तज्ज्ञांना आता आयसीसीच्या अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.