मुंबई प्रतिनिधी :
दि. २१ ऑगस्ट २०२५
बेस्ट पतपेढी निवडणुकीतील अपयशानंतर राजकारणात एक नवं वळण आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी, ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेऊन अर्धा तासांहून अधिक चर्चासत्र पार पाडलं. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही त्यांच्यासोबत होते.
ही भेट नेमकी कशाबद्दल होती, याबाबत तर्कवितर्क सुरु असतानाच, राज ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन स्वतः या भेटीबद्दल खुलासा केला.
राज ठाकरेंचा खुलासा – “वाहतूक समस्या आणि शहरी नियोजनावर सविस्तर चर्चा”
“गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांसोबत शहरी विकासासंबंधी मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे,” असं स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, “२०१४ मध्ये मी अॅस्थेटिक्सवर १६ मिनिटांची डॉक्युमेंट्री तयार केली होती. टाऊन प्लॅनिंग हा माझा खास आवडीचा विषय आहे.”
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व संभाजीनगरसह विविध शहरांतील वाढत्या रिडेव्हलपमेंटच्या कामांबद्दल चिंतेचा सूर आळवत त्यांनी म्हटलं, “रोज हजारो लोक शहरांमध्ये स्थलांतर करतायत, पण रस्ते नाहीत, वाहतूक विस्कळीत आहे. रस्त्यांची शिस्त नाही, नियोजनाचा अभाव आहे. आपण कबुतर हत्तीत अडकलोय!”
त्यांनी पुढे सांगितलं, “पावसाळ्यात मुंबईत जो गोंधळ उडतो, त्याला मूळ कारणं म्हणजे अपुरी पायाभूत सुविधा, बेसुमार वाहनांची वाढ, आणि वाहनांसाठी जागेचा अभाव. वाहनांवर मर्यादा आणणं गरजेचं आहे. केवळ उंच इमारती बांधण्यात आपण गुंतलो आहोत, पण वाहतुकीसाठी आवश्यक जागा कुठं आहे? रस्ते बांधणं आता एक ‘बिझनेस’ झालाय.”
‘अर्बन नक्षलवादापेक्षा या प्रश्नाकडे पाहा’
राज ठाकरेंनी अर्बन समस्यांबद्दल नाराजी व्यक्त करताना स्पष्ट शब्दांत म्हटलं, “नको तिथे भीतीचं वातावरण तयार केलं जातं. अर्बन नक्षलवादाचा मुद्दा मांडला जातो, पण खरी भीती वाढत्या शहरी गोंधळामुळे आहे. याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.”
राजकीय वर्तुळात खळबळ : पराभवानंतरच ही भेट का?
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलचा पूर्ण पराभव झाल्यानंतर लगेचच फडणवीसांची घेतलेली ही भेट राजकीयदृष्ट्या लक्षणीय मानली जात आहे. एकाही जागेवर विजय मिळवता न आल्याने युतीच्या प्रभावावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
अलीकडेच संजय राऊत यांनी मनसेसोबत युती करून महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा इशारा दिला होता. मात्र, यानंतर लगेचच राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेल्याने त्या युतीबाबत शंका निर्माण झाली आहे.
फडणवीसांसोबत याआधीही ‘गुप्त’ भेट
हिंदी सक्तीविरोधी मोर्च्याच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे यांनी यापूर्वी फडणवीसांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे ‘वर्षा’वर झालेली ही दुसरी भेट निव्वळ प्रशासकीय मुद्द्यांपुरती मर्यादित आहे की त्यामागे अधिक मोठं राजकीय गणित आहे, याबाबत चर्चा तापली आहे.